- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या परिसरात दवा म्हणजे औषधींबरोबर दारूही मिळत असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली आहे.
३५ रुपयांना मिळणारी देशीची बाटली ७० ते १०० रुपयांत घाटी रुग्णालयात सर्रास विक्री होत असल्याची माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. बुधवारी याचे सत्य पडताळण्यात आले. ओपीडीसमोरील जागेत दुचाकीवर आलेल्या इसमाकडून हा धंदा सुरू असल्याचे समोर आले. परिसरातील काही जण त्याचे रोजचे ग्राहक असल्याचे समजते. एका व्यक्तीशी दारूचे पैसे घेण्यावरून वाद सुरू होता. या सगळ्या प्रकाराचे ‘लोकमत’ने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. याची चाहूल लागताच त्याने पोबारा केला. त्याच्याकडून दारू विकत घेतलेल्या व्यक्तीशी संवाद साधल्यानंतर सदर व्यक्तीकडून घाटीत रोज दारू विकण्याचा उद्योग सुरू असल्याचे समजले. घाटीत यापूर्वी नशेखोर व्यक्तींकडून महिला डाॅक्टरांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. परिसरात सुरक्षारक्षक व पोलीस असतात. तरीही बिनधास्त हा प्रकार सुरू आहे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे अशक्य आहे. पोलिसांनी इकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे घाटीतील अधिकारी म्हणाले.
घाटीत कोठे आणि कशी होते दारू विक्री?घाटीतील ओपीडीसमोरील मोकळ्या जागेत, अपघात विभागाजवळील शेड आणि मेडिसीन विभागासमोरील शेडमध्ये सर्रास दारुची विक्री होते. याठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या सर्रास दिसतात. घाटीशी काही संबंध नसलेल्या व्यक्तीही येतात. यात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचेही लोक आहेत. त्यांच्यासह भिकाऱ्यांना हा इसम अधिक पैसे आकारून बाटल्या देताे. पहाटे ५ ते ८, दुपारी १२ ते २ आणि सायंकाळी ६ ते १० वाजेदरम्यान हा उद्योग चालतो. मोबाईलवर संपर्क केल्यानंतरही दारू घेऊन इसम घाटीत येतो.
दारू विकणारा आणि विकत घेणाऱ्यामधील संवाद :विकणारा : आणखी १५ रुपये द्यावे लागतील.घेणारा : तेवढेच पैसे आहेत. थोडा वेळ थांब.विकणारा : पैसे लागतील.घेणारा : थोडा वेळ लागेल. मला नाइंटी (दारू) दे.विकणारा : थोडा वेळ थांब.
दारू विकत घेतलेल्या व्यक्तीशी झालेला संवाद :- प्रतिनिधी : किती रुपयांत दिली दारू?- व्यक्ती : ७० रुपयांत दिली.- प्रतिनिधी : रोज येतो का तो विक्रेता ?- व्यक्ती : हो, सकाळी आणि दुपारी.- प्रतिनिधी : इतर कोणी विकत घेतात का?- व्यक्ती : खूप जण ग्राहक आहेत, त्याचे.