छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात महिन्याला एक ते दीड कोटीची औषधी मोफत दिली जाते. मात्र, आजघडीला औषधींच्या तपासणीसाठी ‘एनएबीएल’ ॲक्रीडेशन असलेल्या लॅबची शोधाशोध केली जात आहे. मात्र, औषधींची घाटीतच तपासणी होऊ शकेल का? यादृष्टीने प्रशासनाकडून आता चाचपणी करण्यात येत आहे.
घाटी रुग्णालयात बनावट औषधींचा पुरवठा झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. यापुढे असे प्रकार रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर खरेदी केलेल्या औषधींची आधी ‘एनएबीएल’ लॅबकडून तपासणी केली जाईल. औषधींची तपासणी करण्यासाठी ‘एनएबीएल’ लॅब अधिकृती करण्यासाठी घाटी रुग्णालयाने आवश्यक ती प्रक्रिया सुरू केली आहे. या सगळ्यात घाटीतच प्रयोगशाळा उभारून औषधींची तपासणी होऊ शकते का, यासंदर्भातही आता पडताळणी केली जात आहे.
घाटीत सध्या कोणत्या प्रयोगशाळा?घाटी रुग्णालयात आजघडीला पॅथॉलॉजी विभाग, मायक्रोबायोलॉजी विभाग, बायोकेमिस्ट्री विभागाच्या एकूण ३ प्रयोगशाळा आहेत. त्याबरोबरच एक सेंट्रल लॅब आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी दिली.
अन् पुण्याला जाणारे स्वॅब थांबलेकोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर संशयीत रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येत होते, तेव्हा अहवाल येण्यास बराच विलंब होत असे. अशा परिस्थितीत युद्ध पातळीवर प्रयत्न करून घाटीत सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या अंतर्गत विभागीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेमुळे कोरोनाचे अहवाल लवकर मिळणे शक्य झाले. याच धर्तीवर घाटी रुग्णालयात युद्ध पातळीवर औषधींची तपासणी करणारी प्रयोगशाळा सुरू करण्याची आवश्यकता आहे. यातून औषधी नमुनेही इतर शहरात, इतर राज्यांत पाठविणे थांबू शकते.
अभ्यास केला जाईलघाटीत औषधींची तपासणी सुरू होण्याच्या दृष्टीने अभ्यास केला जाईल. घाटीतच लॅबच्या माध्यमातून औषधींची तपासणी करता येईल का, यासंदर्भात फार्माकोलॉजी विभागासोबत चर्चा केली जाईल.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता.