औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने १३ जानेवारी रोजी परीक्षा मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतच परीक्षेच्या कामात असहकार्य करणारांविरुद्ध निर्णय होईल.विद्यापीठाने आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत तसेच त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात बेजबाबदारपणा दाखविणारे प्राध्यापक, सह केंद्रप्रमुख, भरारी पथकांतील सदस्य व चेअरमन अशा एकूण ८०० जणांविरुद्ध कोणती कारवाई प्रस्तावित करायची, त्याबद्दल परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत यापूर्वी निर्णय घेण्यात आला होता की, परीक्षेचे काम हे अतिमहत्त्वाचे समजून सर्व संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापक, प्राचार्य व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या कामात दुर्लक्ष करणारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, हाही निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाने नियुक्त केलेले सह केंद्रप्रमुख व भरारी पथकांपैकी जवळपास ६५ जणांनी परीक्षेच्या कामात दुर्लक्ष केले. शिवाय उत्तरपत्रिका तपासणीसाठी स्थापन केलेल्या चार जिल्ह्यांतील ९ पदवी व विद्यापीठातील १ पदव्युत्तर मूल्यांकन केंद्रांकडे पाठ फिरवणाऱ्या ७३५ प्राध्यापकांना परीक्षा विभागाने कारणेदर्शक नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित प्राध्यापकांनी आपल्या प्राचार्यांमार्फत नोटिसांचा खुलासा पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप अनेक प्राध्यापकांनी नोटिसांचा खुलासा परीक्षा विभागाकडे सादर केलेला नाही. खुलासा न करणाऱ्या प्राध्यापकांविरुद्ध परीक्षा मंडळाच्या बैठकीत एकतर्फी निर्णय घेतला जाणार आहे.
परीक्षा मंडळाची १३ जानेवारीला बैठक
By admin | Published: December 30, 2014 12:54 AM