मेटे मेटाकुटीला : कृउबा निवडणुकीत चौरंगी लढतीची शक्यता बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये क्षीरसागरांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीची मोट बांधण्यासाठी आ. विनायक मेटे यांनी सोमवारी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीला विविध पक्षाच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. प्रमुख पदाधिकाऱ्यांअभावी एकमत झाले नाही. त्यामुळे चौरंगी लढतीची शक्यता वाढली आहे.कृउबावर गेली अनेक वर्षे वर्चस्व गाजविणाऱ्या आ. जयदत्त क्षीरसागर यांना शह देण्यासाठी आ. मेटे यांनी ताकद लावली आहे. त्यांनी क्षीरसागर विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली. यावेळी माजी आ. जनार्दन तुपे, भाजपचे नवनाथ शिराळे, अॅड. सर्जेराव तांदळे, शिवसेनेचे सचिन मुळूक, रासपचे राहुल बनगर, रिपाइंचे राजू जोगदंड, माजी मंत्री सुरेश नवले गटाचे आसाराम आमटे यांनी उपस्थिती लावली. शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, प्रभाकर कोलंगडे, अनिल घुमरे, शिवाजी जाधव, सुभाष सपकाळ, सुहास पाटील, राहुल मस्के यांचीही उपस्थिती होती.या बैठकीत केवळ चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. क्षीरसागरांच्या ताब्यातून कृउबा खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे अशी अपेक्षा आ. मेटे यांनी व्यक्त केली. त्यासाठी हवे तर शिवसंग्रामला कमी जागा सोडा, अशीही तयारी त्यांनी दर्शवली. शिवाय, नेतृत्व कोणीही घ्या, परंतु क्षीरसागरांना झटका द्या, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, ठोस निर्णय झाला नाही.बैठकीनंतर आ. मेटे वगळता इतर पक्षाचे पदाधिकारी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडे गेले. मात्र, त्यांनीही आपला निर्णय अंधातरीच ठेवत १८ मे पर्यंत ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली. भाजपपेक्षा बीड तालुक्यात शिवसेना वरचढ आहे. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्यासाठी मेटे यांची धडपड सुरू आहे. मात्र, सेना-भाजप एकत्रित लढल्यास तिरंगी अन्यथा स्वतंत्र लढल्यास चौरंगी लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.अशीही शक्यता...पालकमंत्री पंकजा मुंडे व आ. विनायक मेटे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मेटे यांंच्याऐवजी भाजप छुपी युती करून राष्ट्रवादीच्या पाठीमागे ताकद लावू शकतो, अशी शक्यता देखील राजकीय वर्तूळातून व्यक्त होऊ लागली आहे. मेटेंच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)
बैठक निष्फळ !
By admin | Published: May 16, 2016 11:27 PM