ऑनलाईन लोकमत
बीड/ माजलगांव : शासनाने दीड वर्षापुर्वी साथीचे व संसर्गजन्य रोगांवर तात्त्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती गठीत केली होती. परंतु; जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या व्यस्ततेमुळे या समितीची दीड वर्षात एक ही बैठक झाली नाही.
दीड वर्षापुर्वी नागपुर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लु चा प्रादुर्भाव झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालये, महानगर पालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे शासनाला आढळून आले होते. त्यामुळे साथीच्या व संसर्गजन्य रोगांवर आळा बसवण्यासाठी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती स्थापना करण्याचे आदेश शासनाने काढले होते. पावसाळ्यात साथीच्या रोगा सोबतच स्वाईन फ्ल्यू ने डोके वर काढल्याने या समितीची बैठक होणे अपेक्षित होते. परंतु; ग्राम विकास मंत्री व जिल्हाच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या वेळे अभावी समिती स्थापणे पासून एकही बैठक झालेली नाही.
या समिती मार्फत जिल्ह्यात राज्याच्या व केंद्राच्या आरोग्य विषयक विविध योजना राबल्या जातात, वेगेवेगळ्या विभागात समन्वय घडवून आणणे, संबंधीत विभागाला निर्देश देणे, सार्वजनिक आरोग्य संस्थाचा आढावा घेणे व विविध उपाययोजना
सुचवणे अशी काही महत्वाची कामे या मार्फत होणे अपेक्षित आहे.
तात्काळ बैठक व्हावी
सध्या जिल्ह्यात साथीच्या रोगाने थैमान घातले असून या समितीची बैठक न झाल्यामुळे यावर उपाययोजना करणे संबंधीत विभागाच्या अधिका-यांना अवघड चालले आहे. तात्काळ बैठक घेऊन आरोग्य समस्या सोडवाव्यात.
- डॉ. उध्दव नाईकनवरे, सदस्य, जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती
बैठक घेण्याबाबत प्रयत्न सुरु
समितीची स्थापना झाल्यापासुन बैठक घेण्यासाठी आम्ही दोन वेळा पालकमंत्र्यांना पत्र व्यवहार केला होता. मात्र, त्यांच्या वेळे अभावी बैठक होऊ शकली नाही. लवकरच त्यांची वेळ घेऊन बैठकीचे नियोजन करण्यात येईल.
-नागेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक व सचिव, जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती