- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील ‘लक्ष्मीदर्शन’च्या रकमेत वाढ करण्यासाठी यंत्रणेने मध्यंतरी थेट बैठक घेतली. यात दुचाकीच्या फाईलचे ३६० वरून ५०० रुपये करण्याची मागणी करण्यात आली; परंतु एवढी रक्कम ग्राहकांना दाखवायची कशी, असा सवाल उपस्थित करून अनेक शोरूमचालकांनी रक्कम वाढीला विरोध दर्शविला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आरटीओ कार्यालयात सर्वसामान्य जर स्वत:च एखादे काम करण्यास गेला, तर त्याला एका खिडकीवरून दुसºया खिडकीवर चकरा मारण्याची वेळ येते. आॅनलाईन प्रणालीनंतरही एजंटशिवाय काम शक्यच नाही, असाच अनुभव दररोज अनेक वाहनधारकांना येतो. शहरातील अनेक शोरूमचालकांनाही याच अडचणीला सामोरे जावे लागत आहे. व्यवसाय सुरळीतपणे करण्यासाठी आरटीओ कार्यालयातील यंत्रणेला दुचाकी वाहनाच्या प्रत्येक फाईलपोटी ३६० रुपये द्यावे लागत आहेत.
महिन्याकाठी वेळेवर रक्कम देऊनही कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत; परंतु त्याविषयी काही बोलता येत नाही. आॅनलाईन प्रणाली कार्यान्वित झाल्याच्या दोन वर्षांतच फाईलसाठी देण्यात येणारी रक्कम परवडत नाही, म्हणून मध्यंतरी बैठक घेण्यात आली. यात नव्याने सहभागी झालेल्या यंत्रणेकडून रकमेत वाढ करण्याची मागणी झाली; परंतु रकमेत वाढ कशी करायची आणि ती रक्कम दाखवायची कशी, असा सवाल काही शोरूमचालकांनी उपस्थित केला. त्यामुळे आणखी काही दिवस जी रक्कम सुरू आहे, तीच सुरू राहू द्यावी, अशी विनंती करावी लागली.
यंत्रणेतील तिघांवर कारवाई करा‘लक्ष्मीदर्शन’ची रक्कम ग्राहकांकडून काढून देणे पटत नाही; परंतु यंत्रणेच्या मनमानीमुळे ती द्यावीच लागते. ही यंत्रणा प्रत्यक्षात समोर येत नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच भागते आणि आमची अडचण होते. आॅनलाईन प्रणाली अधिक कार्यक्षम झाली, तर रक्कम देण्याची वेळ येणारच नाही. या यंत्रणेतील तिघांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हालण्याची गरज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.