मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबादेत होणार पाहणी
औरंगाबाद : मराठवाड्यातील २६ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे झाले असून, त्याचा आढावा घेत पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २० आणि २१ डिसेंबर रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांतच पथक पाहणी करणार आहे.
अतिवृष्टीच्या परिस्थितीचे पंचनामे आणि छायांकित अहवाल विभागीय प्रशासन पथकासमोर ठेवणार आहे. दोन पथकांमध्ये एक पथक औरंगाबाद आणि दुसरे पथक उस्मानाबादला जाणार आहे. दोन दिवस हा पाहणी दौरा चालणार आहे. पाहणीचा अहवाल दिल्यानंतर नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फंड (एनडीआरएफ) मधून शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. पथकात केंद्र व राज्यातील कृषी आणि मदत-पुनर्वसन विभागाच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.