लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील नगरपालिकेत विविध विषयांवर चर्चा व्हावी, तसेच त्यावर उपाययोजना करता याव्यात, यासाठी बीड पालिकेत विशेष सभा बोलावली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता सभेची वेळ होती; परंतु काही कारणास्तव ती बदलून दुपारची ३ अशी ठेवली. मात्र, तरीही ही सभा बारगळली. राजकारण अन् वाद यामुळे ही सभा बारगळल्याची चर्चा पालिकेत ऐकावयास मिळाली.१ ते ७ जुलै यादरम्यान संपूर्ण राज्यात होणाऱ्या वन महोत्सवाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नगराध्यक्षांना पत्र देऊन विशेष सभा घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी ११ वाजता ही सभा आयोजित केली होती. यासंदर्भात संपूर्ण नगरसेवकांना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमन १९६५ अन्वये परिशिष्टात नमूद केलेल्या कामकाजासाठी सभेस उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती. त्याप्रमाणे काकू-नाना आघाडीसह इतर सर्व नगरसेवक नगरपालिकेत सकाळी साडेदहा वाजता हजर झाले. त्याप्रमाणे त्यांनी येथील हजेरी पटावर वेळेसह स्वाक्षरी केली. सभेच्या वेळेपर्यंत त्यांनी वाट पाहिली; परंतु अचानक त्यांना पालिकेतील दूरध्वनीवरून फोन आला. सकाळची सभा रद्द करुन तिची वेळ दुपारी ३ वाजता ठेवल्याचे सांगण्यात आले. तरीही हे सर्व नगरसेवक पालिकेत ठाण मांडून होते. बारा वाजेपर्यंत नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी पालिकेत न आल्याने उपस्थित नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी, नगराध्यक्षांनी मनमानी कारभार चालविल्याचा आरोप करीत त्याला आळा बसवावा, अशी तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.दरम्यान, नगरपालिकेच्या निवडणुकीपासून पालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. वादविवाद, मतभेद याचा त्रास सर्वसामान्य जनतेसह पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. त्यामुळे पालिकेतील दहशत उघड झाली होती.सभेतील चर्चेचे विषयनगरसेवकांना दिलेल्या नोटिसीत चार विषयांवर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट लिहिले होते. त्यात वृक्ष लागवड, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना व महिला सबलीकरण यांचा समावेश आहे. परंतु दिवसभरात पालिकेच्या सभागृहात विशेष सभा न झाल्याने या सर्व विषयांवरील चर्चा केवळ कागदापुरतीच राहिली.
पालिकेची सभा बारगळली
By admin | Published: June 19, 2017 11:43 PM