औरंगाबाद : येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात मराठवाड्यातील समन्यायी पाणीवाटप, येथील अनुशेषाच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त निधी मिळवून घेण्यासाठी ९ जानेवारी रोजी सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेआहे. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे सकाळी १० वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. यात समन्यायी पाणीवाटप समजून घेणे व येत्या पावसाळ्यापासून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी समन्यायी वाटपानुसार मिळवून घेणे, रस्ते, शेती, सिंचन, शिक्षण, आरोग्य, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांसाठीच्या योजना, रेल्वे व इतर बाबींच्या अनुशेषावर चर्चा होईल.अंमलबजावणीचे नियोजन, अनुशेषाची रक्कम व चालू वर्षाचा निधी व दोन्हीसह बजेटमध्ये तरतूद करून घेणे, तज्ज्ञांची मते जाणून घेऊन पुढील ५ वर्षांच्या कालावधीत करावयाचे नियोजन, मराठवाड्याच्या सर्व क्षेत्रात असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी व इतर समस्या मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या खातेनिहाय बैठकांच्या तारखा घेऊन नियोजन व अंमलबजावणी करून घेणे, यावर बैठकीत चर्चा होणार आहे.मराठवाडा विभागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी पक्षभेद विसरून बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन आ. प्रशांत बंब यांनी केले आहे.
मराठवाड्यातील अनुशेषासंदर्भात बैठक
By admin | Published: December 28, 2014 1:17 AM