छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सुमारे ६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी खीळ बसली आहे. नववर्षांत लोकसभा निवडणुकांची धामधूम आहे. त्यामुळे ही कामे वेगाने पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे. या प्रकल्पांच्या बैठका आणि चर्चेतच २०२३ वर्ष संपले. प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा जिल्हावासीयांना कायम आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाच्या संचिकेवर अंतिम निर्णय झालेला नाही. लेबर कॉलनी-विश्वासनगर येथील साडेतेरा एकरमधील प्रशासकीय संकुलांच्या टेंडरमध्ये राजकीय लुडबूड सुरू असल्यामुळे त्यावर निर्णय होत नाही. वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्याचे कामही ठप्प आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या डीपीआरचे काम अद्याप झालेले नाही. जिल्हा परिषद मुख्यालय इमारत बांधून केव्हा मिळणार, असा प्रश्न आहे. हवमानाच्या अचुक अंदाजासाठी बसविण्यात येणाऱ्या सी-डॉल्पर रडारला केंद्र शासनाचे ग्रीन सिग्नल मिळालेले नाही. प्रशासकीय सूत्रांच्या मते, राजकीय पाठपुराव्याअभावी या सगळ्या कामांना खीळ बसली आहे.
हे आहेत प्रकल्प.....
१२५ कोटींचे मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक...मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लेबर कॉलनी, विश्वासनगर येथील १३.५ एकर जागेपैकी काही जागेत मुक्तिसंग्रामाचे स्मारक उभारण्याचा निर्णय चार महिन्यांपूर्वी झाला आहे. एक स्मारक असताना दुसरे कशासाठी बांधायचे, असा सूर मंत्रालयातील काही महाभाग आवळत आहेत. १०० वरून १२५ कोटी रुपयांची तरतूद या स्मारकासाठी करण्यात आली आहे. पाठपुराव्याअभावी या कामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
१२५ कोटींची प्रशासकीय इमारत....लेबर कॉलनी येथील १३.५ एकर जागेवर प्रशासकीय संकुल तथा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यासाठी १४७ कोटी शासनाने मंजूर केले आहेत. साबां विभागाने १२५ कोटी रुपयांच्या कामासाठी टेंडर मागवून दोन महिने झाले असून, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. अडीच महिन्यांतील टेंडरचा प्रवास संशयास्पद असून, टेंडर रिकॉल करण्यासाठीच ही सगळी उठाठेव सुरू आहे.
४९ कोटींची जिल्हा परिषद इमारत....४८ कोटी ८३ लाखांचा इमारत बांधकामाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयाच्या नवीन इमारत बांधकाम टप्पेनिहाय सुरू आहे. सध्या जि. प.चे अनेक कार्यालये दुसऱ्या ठिकाणी सुरू आहेत. नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होऊन दीड वर्ष लोटले आहे. नवीन इमारतीत जि. प.चे नववर्षात तरी सुरू होणार काय, असा प्रश्न आहे.
११२ कोटींचा घृष्णेश्वर विकास आराखडा....वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर विकास आराखडा योजनेचे काम चार वर्षांपासून ठप्प पडले आहे. ११२ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. ते काम अजूनही पूर्ण झालेले नाही. १० टक्क्यांच्या आसपास काम झाले आहे. भक्तनिवास, सामाजिक सभागृहाच्या कामाची आता कुठे सुरुवात झाली आहे.
१५० कोटींचे संत ज्ञानेश्वर उद्यान....पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सुधारित डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. सुमारे १५० कोटी रुपयांतून पर्यटनवृद्धीसाठी या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे. चार वर्षांपासून या कामाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. २०० एकरमध्ये हे उद्यान आहे.
४० कोटींच्या रडारचे धोरण ठरेना...मराठवाड्यासाठी सुमारे ४० कोटींतून सी-डॉप्लर रडार हवामानाच्या अचूक माहितीसाठी बसविण्याचा निर्णय झाला आहे. म्हैसमाळ येथे हे रडार बसविण्यात येणार आहे. जून २०२१ पासून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लालफितीच्या कारभारामुळे रडार बसविण्याच्या कामाला अद्याप सिग्नल मिळालेले नाही.