औरंगाबाद : ऐतिहासिक पाणचक्की समोरील ४०० वर्ष जुन्या मेहमूद दरवाज्याची पडझड सुरू झाली होती. कोणत्याही क्षणी दरवाजा कोसळेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना स्मार्ट सिटी प्रशासनाने डागडुजीचा निर्णय घेतला. ३८ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण, संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या कामाला सोमवारी सुरुवात करण्यात आली.
मेहमूद दरवाजाला मागील वर्षी दोन वाहनाने धडक दिल्याने दरवाजाचा काही भाग निखळला होता. दरवाजा धोकादायक बनल्याने मनपाकडून वाहतूक बंद करण्यात आली. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दरवाजाच्या डागडुजीचा निर्णय घेतला. स्मार्ट सिटी प्रशासनाकडून दोन ते तीन वेळेस निविदा काढण्यात आली. कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. चौथ्या वेळेस प्रतिसाद मिळाल्याने काम निश्चित करण्यात आले.
दरवाजाच्या ज्या भागाची डागडुजी करता येऊ शकत नाही, तो भाग पाडून तेथे नवीन बांधकाम करण्यात येईल. चारशे वर्षांपूर्वी दरवाजा बनवण्यासाठी जी पद्धत वापरण्यात आली होती त्याच पारंपरिक पद्धतीने हे काम करण्यात येणार आहे. यासाठी चुना भिजवण्यासाठी हौददेखील तयार करण्यात आला आहे. चार महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्णत्वास येईल. दरवाजाचे नूतनीकरण करून त्याला त्याचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटीकडून करण्यात येत आहे. हा दरवाजा अत्यंत खराब स्थितीत असल्यामुळे दगड कोसळण्याची भीती आहे म्हणून स्मार्ट सिटीतर्फे आवाहन करण्यात आले की, काम होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी रस्ता वापरावा. काम पूर्ण झाल्यानंतर दरवाजाचे सौंदर्यीकरण आणि आकर्षक रोशणाईदेखील करण्यात येणार आहे.