औरंगाबाद : रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्यामुळे दुचाकीस्वाराला मारहाण करून त्याच्यावर गोळी झाडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला पाच महिन्यांनंतर बेगमपुरा पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी हा मालेगाव, नाशिक पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मालेगाव येथे सुमारे १४ गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांत त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
मेहताब अली (रा. मालेगाव, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जयभीमनगर, टाऊन हॉल येथील रवी भास्कर भालेराव हे ३१ मे रोजी रात्री मकईगेट रस्त्यावरील त्यांची मोटारसायकल काढत होते. तेथे रस्त्यात आरोपी मेहताबने त्याची मोपेड उभी केली होती. रवीने त्याला मोपेड बाजूला घेण्यास सांगितल्याने आरोपीला राग आला आणि त्याने रवीच्या श्रीमुखात भडकावली. ‘मला का मारतोस’, असे रवीने विचारल्याने,‘ तू मुझे पहेचानता नही क्या,’असे म्हणत त्याने कमरेचे पिस्तूल काढून रवीवर गोळी झाडली. प्रसंगावधान राखून रवी बाजूला झाल्याने त्याचे प्राण वाचले. गोळीबाराच्या आवाजाने लोक जमा होत असल्याचे पाहून आरोपी तेथून पसार झाला होता.
याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो मालेगावला आला. तेथे एका गँगसोबत त्याचे भांडण झाले. मारहाण करून पळून जाताना त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर तो उपचारासाठी बेंगलोरला गेला. तेथे दीड महिना उपचार घेतल्यानंतर तो मुंबईला गेला. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी तो प्रयत्न करीत होता. एक जणाच्या ओळखीने तो वकिलाला भेटण्यासाठी औरंगाबादेत आल्याची माहिती पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी घनश्याम सोनवणे यांना मिळाली. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक हाके, कर्मचारी सुखानंद पगारे, अविनाश जोशी, सचिन नागरे आणि रामचंद्र जल्हारे यांना सोबत घेऊन त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपीची माहिती मिळाली.
सुमारे २० गुन्हे आणि तडीपार आरोपीआरोपी मेहताब विरोधात मालेगाव शहर, छावणी ठाणे, आयेशानगर ठाणे, मालेगाव तालुका आणि ग्रामीण भागात जबरी चोरी, घरफोडी, बलात्कार, जिवे मारण्याचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आणि दंगलीचे गुन्हे आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांत त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.