औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्या आणि समायोजनाची लगबग आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेला सुधारित संचमान्यतेचा घोळ अखेर आज सोमवारी मिटला. संचमान्यतेचा तिढा सुटल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा मार्गही मोकळा झाला आहे. सुधारित संचमान्यतेनुसार जिल्हाभरात प्राथमिक सहशिक्षकांची संख्या मात्र, पुन्हा एकदा घटली आहे. परिणामी, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, आॅनलाईन संचमान्यतेनुसार मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षकांची तालुकानिहाय मंजूर पदे उद्या मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कळवली जातील. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालय हे अतिरिक्त शिक्षकांचा ताळमेळ लावून समायोजनाची प्रक्रिया सुरू करतील. त्यानंतर लगेच पदोन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण सुरू केली जाणार असून मग शिक्षकांच्या बदल्या होतील. अलीकडे दिवसेंदिवस शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही खाजगी इंग्रजी शाळांचे फॅड वाढत चालले आहे. त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांवर होत आहे. परिणामी जि.प. शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे त्या शाळांवरील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. मागील तीन-चार वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार आॅनलाईन संचमान्यता करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ५९७, सहशिक्षकांची ६ हजार ६९७ आणि पदवीधर शिक्षकांची २ हजार १२९ पदे मंजूर झाली आहेत. तथापि, ३० सप्टेंबर रोजीच्या पटसंख्येनुसार शाळानिहाय कुठे शिक्षक अतिरिक्त तर कुठे कमीही ठरू शकतील. याचा ताळमेळ लावण्याची प्रक्रिया सध्या गटशिक्षणाधिकारी स्तरावर सुरू आहे. उद्या मंजूर पदांचा अहवाल गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना पाठविला जाईल.
संचमान्यतेचा घोळ अखेर मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2016 12:36 AM