विकास राऊत, औरंगाबादपूर्व मतदारसंघातून महापौर कला ओझा यांनी आज शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. ओझा यांच्या उमेदवारीमुळे खा. चंद्रकांत खैरे यांचीच प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने पणाला लागणार आहे. सेनेकडून राजू वैद्य, सुहास दाशरथे यांची नावेदेखील पूर्व मतदारसंघासाठी चर्चेत होती. दरम्यान, दाशरथे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे, अपक्ष, अशी बहुरंगी लढत होणार असल्याचे सध्या तरी दिसते आहे. १ आॅक्टोबरनंतर किती उमेदवार रिंगणात राहतात, ते स्पष्ट होईल. खा. खैरे यांनी महापौरांचा अर्ज मुहूर्त काढून दाखल केला. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मिरवणुकीचे नियोजन केले. ऐनवेळी उमेदवार बदलण्याची कुणकुण लागल्यामुळे महापौरांचा बी फॉर्म त्यांनी स्वत:कडेच ठेवला होता. २९ आॅक्टोबर २०१२ पासून ओझा या महापौरपदाची धुरा सांभाळत आहेत. खा. खैरे यांच्यामुळेच त्यांना महापौरपदाची संधी मिळाल्याचे त्यावेळी बोलले गेले. खैरे यांनी माजी आ. तनवाणी यांच्यासह अनेकांचा रोष त्यावेळी पत्करला होता. महापौरांचे वॉर्डाकडे दुर्लक्ष झाल्यावरून आणि प्रशासनावर पकड नसल्याच्या कारणावरून खैरे व महापौरांमध्ये वादही झाले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये महापौरांनी प्रचारात प्रचंड परिश्रम घेतल्याची पावती खैरेंनी दिली तसेच विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू होताच महापौरांचे नाव ‘मध्य’ मतदारसंघातून त्यांनी चर्चेत आणले. समांतर जलवाहिनीच्या भूमिपूजनप्रसंगीही पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासमक्ष खा. खैरे यांनी महापौरांची स्तुती केली होती. तसेच श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी खा. खैरे यांनी महापौरांना पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे भाकीत केले होते.
महापौरांसाठी खासदारांची प्रतिष्ठा लागणार पणाला
By admin | Published: September 28, 2014 12:29 AM