खुलताबाद (औरंगाबाद ) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मागासवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या काही सदस्यांनी तीन महिन्यांच्या मुदत वाढीनंतरही अद्याप जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. अशा सदस्यांना लवकरच नोटीस बजावून अपात्र ठरविण्याची प्रक्रिया महसूल विभागाने सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन दीड वर्ष झाली तरी अद्याप अनेकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेली नाही. सुरुवातीच्या मुदतीत प्रमाणपत्र न दिल्याने शासनाने 14/2/19 ते 13/5/19 अशी तीन महिन्याची मुदतवाढ दिली होती. मात्र या कालावधीतही अनेक सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. अशा सदस्यांची माहिती जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मागवली आहे. सदर सदस्यांना लवकरच नोटीसा देऊन त्यांची सुनावणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे घेण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांची पदे रद्द होणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
केवळ ६७ जणांनी दाखल केले प्रमाणपत्र प्राथमिक माहितीनुसार तालुक्यात 159 ग्रा.पं.सदस्य हे आरक्षित जागेतून निवडून आले आहेत. मात्र, आतापर्यंत फक्त 67 सदस्यांनीच जातवैधता प्रमाणपत्र सादर केली आहेत. उर्वरित 92 सदस्यांना नियमानुसार महसुल प्रशासन नोटीसा पाठविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.