औरंगाबाद : मुद्रण तंत्रज्ञान व संज्ञापन क्षेत्रातील जगविख्यात संस्था ‘बीजिंग इन्स्टिट्यूट आॅफ ग्राफिक कम्युनिकेशन’ (स्वायत्त विद्यापीठ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यापीठातील मुद्रण तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना संशोधन, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानामध्ये आदान-प्रदानाची संधी मिळणार आहे.मुद्रण तंत्रज्ञान व्यवसायामध्ये शिक्षण, संशोधन करणाऱ्या जगातील पहिल्या पाच संस्थांमध्ये ‘बीजिंग इन्स्टिट्यूट आॅफ ग्राफिक कम्युनिकेशन’ ची ओळख आहे. अशा या संस्थेसोबत आॅल इंडिया फेडरेशन आॅफ मास्टर प्रिंटर्सचे उपाध्यक्ष प्रा. कमल चोप्रा यांच्या पुढाकारातून हा करार करण्यात आला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली या तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी सायंकाळी बैठक झाली. बैठकीस बीजिंग मुद्रण विद्यापीठाचे कुलगुरू लिओ ज्युक, आंतरराष्ट्रीय केंद्राच्या संचालक प्रा. झांग शेरू, कार्यक्रम समन्वयक यो यान, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे, मुद्रण तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. पराग हासे, प्रा. विकास कुमार आदींसह शहरातील मुद्रक उपस्थित होते. यावेळी तिन्ही संस्थेच्या प्रमुखांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. विद्यापीठातील मुद्रण तंत्रज्ञान, पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी, औरंगाबादेतील मुद्रक यांना या कराराचा फायदा होणार आहे. बीजिंग विद्यापीठात मुद्रण उद्योग, मुद्रण तंत्रज्ञान, प्रशिक्षण आदींबाबत संयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी कमल चोप्रा यांच्या मुद्रण इतिहासावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. किशन धाबे यांच्यासह विविध विभागप्रमुख, औरंगाबादेतील मुद्रक सुरेश महाजन, सुहास कुलकर्णी, रवी पळसवाडीकर, रमेश देशपांडे, प्रकाश जोशी, डॉ. डी. एम. भोसले आदींची उपस्थिती होती.
बीजिंगच्या मुद्रण तंत्रज्ञान विद्यापीठासोबत सामंजस्य करार
By admin | Published: May 14, 2016 12:03 AM