औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अमेरिका स्थित ‘गर्जे महाराष्ट्र ग्लोबल इनोव्हेशन अकॅडेमी’ यांच्यात सामंजस्य करार करार झाला आहे. जागतिक पातळीवरील उद्योजक, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचा समावेश असलेल्या या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यातील स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यापीठातील ‘एआयसी-बामू फाऊंडेशन’ व अमेरिकेतील मराठी माणसांसाठी कार्य करणारी सामाजिक संस्था ‘गर्जे मराठी‘ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप अॅक्सलेटर प्रोग्राम’अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहोत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी रविवारी ऑनलाइन पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, ‘गर्जे मराठी’चे अध्यक्ष आनंद गाणू व सुधीर कदम (अमेरिका), अलंकार जोशी (सिंगापूर), प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, संयोजक डॉ. सचिन देशमुख, संजय शिंदे हे सहभागी झाले होते.
मराठवाड्यातील विद्यार्थी, संशोधक यांच्यात मोठी क्षमता असून त्यांना ‘गर्जे महाराष्ट्र’सोबत झालेल्या कराराच्या माध्यमातून स्टार्टअप सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. ‘सिलिकॉन व्हॅली’च्या धर्तीवर नवउद्योजकांसाठी सोळा आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम निःशुल्क उपलब्ध करण्यात आला आहे. ‘गर्जे महाराष्ट्र’द्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सेवा नि:शुल्क असतील. यासाठी कसल्याही प्रकारे आर्थिक सहभाग घेतला जाणार नाही, असे सुधीर कदम म्हणाले. पात्र नवउद्योजकांनी यात सहभाग घेऊन जागतिक पातळीवरील अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन प्राप्त करावे आणि उत्तुंग यशाला गवसणी घालावी, असे आवाहन संस्थापक आनंद गानू व अलंकार जोशी यांनी केले.
चौकट.....
सोळा आठवड्यांचे प्रशिक्षण
नवीन उद्योजकांसाठी आयोजित या सोळा आठवड्यांच्या प्रशिक्षणामध्ये उद्योगाच्या प्रारंभीच्या काळात आवश्यक दृष्टिकोन, साधने आणि कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागींना आपली अंगभूत कौशल्ये अधिक विकसित करून ती आपल्या गुंतणूकदारांसमोर सादर करता येतील. आपला उद्योग सुरू करताना, विकसित करताना आणि विस्तार करताना येथील प्रशिक्षकांचे नियमित मार्गदर्शन घेता येईल. या प्रशिक्षणादरम्यान यात सहभागींना येणाऱ्या अडचणी, अनुभव हे सर्वच प्रशिक्षकांसमोर दर आठवड्याला सादर करण्यात येतील.