औरंगाबाद : अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तस्कराला सिटी चौक पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून मेफेड्रॉनच्या (एमडी) १५ पुड्या जप्त करण्यात आल्या. बुधवारी (दि. ८) गणेश कॉलनी भागात ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली.
शेख अब्दुल कदीर ऊर्फ उल्ला शेख मुश्ताक अहेमद (३२, रा. गणेश कॉलनी, रशीदपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक गिरी यांना शेख अब्दुल कदीर ऊर्फ उल्ला हा एमडी ड्रग्ज विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाचे उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, वैज्ञानिक परीक्षण विभागाचे तज्ज्ञ डॉ. संतोष कोते, वैज्ञानिक सहायक नवनाथ वायचाळ, रवी जयस्वाल, सिटी चौकच्या उपनिरीक्षक संगिता गिरी, हवालदार मुनीर पठाण, जनार्धन निकम, शाहीद शेख, अभिजित गायकवाड, सोहेल पठाण यांच्या पथकाने छापा मारुन शेख अब्दुल कदीरला पकडले.
त्याच्याकडे एमडीचे प्रत्येकी ७६० मि. ग्रॅमचे १५ पाऊच, मोबाइल व साडेतीनशे रुपये रोकड, असा ३५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तपास अधिकारी सहायक निरीक्षक सुनील कराळे यांनी त्यास न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजुर केली आहे.