औरंगाबाद : केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशन’ योजनेअंतर्गत ‘मेरा रेशन अॅप’ विकसित करण्यात आले असून, या अॅपच्या आधारे रेशनकार्ड धारकांना धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. मात्र या बहुपयोगी अॅपची सुरुवात औरंगाबाद जिल्ह्यात झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर कार्डधारकांना रांगेमध्ये उभे राहून धान्य घेण्याची गरज राहणार नाही. घरी बसून मोबाईलद्वारे त्यांना धान्य बुक करता येईल. केंद्र शासनाने या अॅपची सुविधा देऊ केली आहे.
अॅपच्या मदतीने जवळच्या दुकानाचा शोध घेता येईल. कार्डची वैधता आणि धान्य घेतलेल्या नोंदी देखील कार्डधारकास मिळतील. सध्या हे अॅप इंग्रजी आणि हिंदी भाषेत असून लवकरच १४ भाषांमध्ये ते उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने असून ७ लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्यांची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२, तर इतर प्राधान्य कुटुंबातील संख्या ४ लाख ८ हजार ४० अशी एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारकांची संख्या आहे.
जिल्ह्यातील कार्डधारकांची संख्या अशी...
रेशनकार्डधारक - ७ लाख ३२ हजार ४४४
बीपीएल - ७८ हजार २८०,
अंत्योदय - ६५ हजार ४८२
केशरी - ४ लाख ८ हजार ४०
क्लीकवर मिळणार ही माहिती...
वारंवार स्थलांतर करणाऱ्यांना या अॅपचा फायदा होईल. अॅपवरून रेशन दुकानाची पूर्ण माहिती मिळेल. यात कार्डधारकांना सूचना, उपाययोजनांसह तक्रारी करता येतील. अन्नधान्य उपलब्धीबाबत पूर्ण माहिती कार्डधारकांना मिळेल. किती धान्य उपलब्ध होणार आहे, यासह शिधापत्रिका अपात्र आहे की पात्र, याचीही माहिती मिळेल.
तक्रारीची असणार आहे सोय
धान्य वितरणाबाबत काहीही तक्रार असल्यास या अॅपवर नोंदविता येणार आहे. रेशन दुकानदाराकडे उपलब्ध असलेले धान्य निकृष्ट असल्यास किंवा धान्य असतानाही धान्य देण्यास दुकानदार टाळाटाळ करीत असेल, तर संबंधितास अॅपवरून कार्डधारकाला तक्रार करता येईल.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी...
प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी सांगितले की, सदरील अॅप सुरू करण्याबाबत अद्याप काहीही सूचना नाहीत. दोन दिवसांपूर्वी वरिष्ठांसोबत व्ही.सी. झाली, त्यातही याबाबत चर्चा झाली नाही. आगामी काळात जशा सूचना येतील, त्यानुसार काम केले जाईल.