वाळूज महानगर : भरधाव ट्रकने पंढरपूरहून रांजणगावकडे जाणा-या दुचाकीस्वार वृद्ध व्यापा-यास धडक दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील कोलगेट चौकात घडली. या अपघातात प्रकाशसिंग सज्जनसिंग मुनोत यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रकाशसिंग सज्जनसिंग मुनोत (६९) यांचे पंढरपुरात किराणा दुकान असून, त्यांच्याकडे रांजणगावचा किरकोळ रॉकेल विक्रीचा परवाना आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रांजणगावात रॉकेल वाटप करुन येतो, असे कुटुंबियांना सांगून दुचाकीने (एम.एच.२०, ई.एक्स.५७३०) पंढरपूरहून रांजणगावकडे निघाले होते. दरम्यान, दुचाकी कोलगेट चौकात आल्यानंतर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पाठीमागून गॅस सिलिंडर घेऊन जाणाºया भरधाव ट्रकने (जी.जे.१२, बी.डब्ल्यू) स्टरलाईट कंपनीकडे वळण घेत असताना जोरदार धडक दिली.
यात दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजुला पडली तर मुनोत हे रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. वडगावचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पवार यांनी मुनोत यांना रस्त्याच्याकडेला हलवून घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रकाशसिंग मुनोत यांच्या पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून प्रकाशसिंग मुनोत यांना मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह फरार झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
पंढरपूर-बजाजनगरात शोककळाघटनेनंतर मुनोत यांचे नातेवाईक व मित्रमंडळीनी शासकीय रुग्णालय व त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्या निधनामुळे पंढरपूर-बजाजनगरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता बजाजनगरातील स्माशानभूमीत मुनोत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.