परभणी : सरत्या आठवड्यात वाढलेल्या जिल्ह्याच्या तापमानात सोमवारी घट झाली. तापमान घटले असले तरी उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाचा पारा तापला नाही. मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाची तीव्रता नागरिकांना यावर्षी जाणवली नाही. परंतु मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली होती. तापमान ४० अंशाच्या पुढे सरकल्याने नागरिक उकाड्याने आणि वाढत्या उन्हामुळे त्रस्त होते. यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान याच आठवड्यात नोंद झाले. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४४ अंशावर पोहोचले होते. तसेच आगामी काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला होता. परंतु सोमवारी जिल्ह्याचा पारा ४० अंशावर उतरला. तापमान कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. शेतकर्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी कामेही हाती घेतली आहेत. ग्रामीण भागात शेतीकामांना वेग आला. ७ जूनपासून पावसाळ्यातील मृगनक्षत्र सुरू होते. उन्हाळ्यातील आणखी १०-१२ दिवस शिल्लक आहेत. या काळात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पारा घटला पण उकाडा कायम
By admin | Published: May 27, 2014 1:00 AM