लातूर : कोरोना महामारीमध्ये आई-वडिलांच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) ने घेतली आहे. ज्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णत: मोफत देण्याचा निर्णय झाला आहे.
लातूर जिल्हा मेस्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बिरादार यांनी पुढाकार घेऊन संस्थाचालकांना ऑनलाइन बैठकीत आवाहन केले. जिल्ह्यात निराधार झालेली १७७ बालके आहेत. त्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेस्टा कटिबद्ध राहील, असे बिरादार यांनी सांगितले. दरम्यान, सहायक धर्मदाय आयुक्त यांना रीतसर पत्र देऊन ‘मेस्टा’ने शैक्षणिक पालकत्वाची भूमिका मांडली. धर्मदाय सहआयुक्तांनीही गरजू, निराधार मुलांना शिक्षणासाठी मदत करावी, असे आवाहन केले.
राज्यात सर्वप्रथम निर्णयलातूर मेस्टाने राज्यात सर्वप्रथम हा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यभर मेस्टाच्या शाखांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनामुळे निराधार झालेल्या मुलांसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
कोणाला मिळणार लाभ...लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची समिती गठित केली असून, ही समिती विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत संस्था आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करेल. गरजू विद्यार्थी व संबंधितांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथे अर्ज पाठवावेत. सोबत कोरोनामुळे मृत्यू पावल्याचे प्रमाणपत्र पालक, भूमिहीन अथवा अल्पभूधारक असल्याचा ७/१२ जोडावा, असे आवाहन रमेश बिरादार यांनी केले आहे. याशिवाय गरजू विद्यार्थी निवडताना समिती उपरोक्त निकष अथवा अन्य पर्यायांचाही विचार करेल.