औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर नवीन पाणीपुरवठा योजना मनपाकडून तयार करून घेतली आहे. तब्बल १७०० कोटी रुपयांची ही योजना असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. शासन मंजुरी मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हे काम करून घेणार आहे. निविदा आठ दिवसांनंतर म्हणजेच आचारसंहिता लागण्यापूर्वी काढण्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
समांतर जलवाहिनीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आजही पडून आहे. मागील दोन वर्षांपासून महापालिका सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करीत आहे. निर्णय येत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासोबत चर्चा करून पाणीप्रश्नी मध्यम मार्ग काढला. महापालिकेला युद्धपातळीवर नवीन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. महापालिकेनेही मागील महिन्यात प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला नियमानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरीही घेण्यात आली. या तांत्रिक मंजुरीचे १७ कोटी रुपये शासनाने देण्याची हमी दिली. आता नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत आहे. मंत्रिमंडळाची बैठक एक ते दोन दिवसांमध्ये होईल. या बैठकीत औरंगाबाद शहराच्या महत्त्वपूर्ण अशा पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळेल. शासनाची मंजुरी मिळताच योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात येईल. प्राधिकरणच योजनेसाठी निविदा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी सोमवारी रात्री एका कार्यक्रमात दिली.
नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षाचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. १६७३ कोटी योजनेचा प्राथमिक खर्च गृहीत आहे.
अशी आहे नवीन योजना :
1673 कोटी योजनेचा एकूण खर्च 533 कोटी मुख्य जलवाहिनी2500 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी273 कोटी अंतर्गत जलवाहिनी254 कोटी पाणी शुद्धीकरण केंद्र27 टाक्या जुन्या वापरणार27 टाक्या नवीन बांधणार660 मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत नवीन एमबीआर 700 कि.मी. नवीन अंतर्गत जलवाहिन्या08 कोटी दरमहा विजेचा खर्च
सातारा, देवळाईचा समावेशनवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा, देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागांचा समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत पालिका हद्दीचे क्षेत्रफळ १७६ वर्ग कि.मी. एवढे आहे. या सर्व भागात एकूण २१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येतील.
मुख्य जलवाहिनीची किंमत ५३३ कोटीनवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १६७३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च ५३३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटी अंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांसाठी लागणार आहेत.