औरंगाबाद : दुष्काळात एकीकडे शासन जनतेला मोफत पाणी पाजते, तर दुसरीकडे टँकरचे पैसे भरूनही पाणीपुरवठा होत नाही, अशी ओरड देवळाईच्या नागरिकांतून होत आहे. पूर्वी या भागात मोफत पाणीपुरवठा टँकरच्या माध्यमातून केला जात असे; परंतु आता मनपात समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. देवळाई गावात पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही. गावातील नागरिक टॅक्स भरूनही त्यांना पाण्यासाठी वेगळेच पैसे मोजावे लागत आहेत. मनपाने मूळ गावाला तसेच म्हाडा कॉलनीत मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. सातारा-देवळाई परिसरात टँकरची संख्या रोडावली असून खाजगी टँकरचा धंदा मात्र तेजीत सुरू आहे. परिसरातील जलस्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ देवळाईवासीयांवर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दुष्काळात मोफत पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असतानाही पैसे घेऊन पाणीपुरवठा केला जात असल्याबाबत नागरिकांनी खंत व्यक्त केली. रोगराई पसरण्याची भीती...विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून, दूषित पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मनपाचे टँकर वेळेवर येत नसल्याने नाईलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नव्यानेच समाविष्ट झालेल्या परिसरातील मूलभूत समस्या मनपा अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने सोडवाव्यात, अशी मागणी बाबूराव जाधव यांनी केली आहे.
म्हाडा, देवळाई परिसर तहानलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2016 11:28 PM