छत्रपती संभाजीनगर : ‘म्हाडा’च्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार ५६ घरांच्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी जाहीर केले. जिल्हाधिकारी कार्यालयात म्हाडा आयोजित प्रधानमंत्री आवास, वीस टक्के सर्वसमावेशक व म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १ हजार ४९४ गाळे, सदनिका व निवासी भूखंडासाठी संगणकीय सोडतीप्रसंगी ते बोलत होते. या सोडतीमध्ये ज्यांना घरे मिळाली नाहीत, त्यांनी निराश होऊ नये. नवीन योजनेत अर्ज करावेत, असे आवाहनही सावे यांनी केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. जे. शेटे, उपायुक्त अनंत गव्हाणे, म्हाडाचे सीईओ मंदार वैद्य, अनिल थोरात, अभियंता नितीन शिंदे, किशोरकुमार काटोटे या वेळी उपस्थित होते. म्हाडाच्या १,४९४ घरांसाठी ४,७५४ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या ५९४ घरांसाठी ७४३, प्रधानमंत्री आवास योजना ४२५ घरांसाठी १,५२ तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या ४३३ घरांसाठी २,६८४ आणि सर्व उत्पन्न गट योजनेंतर्गत ४२ घरांसाठी २७५ अर्ज प्राप्त झाले. सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले.