छत्रपती संभाजीनगर : एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या चैतन्य विश्वास ब्रह्मपुरीकर या विद्यार्थ्यांने पीसीएम ग्रुपमध्ये १०० पर्सेंटाईल मिळवत पैकीच्या पैकी गुण घेतले. राज्यात २८ विद्यार्थ्यांनी असे यश संपादन केले असून, त्यात चैतन्य हा शहरातील एकमेव विद्यार्थी ठरला. ऑनलाईन शिक्षण घेऊन हे यश संपादन केल्याची माहिती चैतन्यने 'लोकमत'शी बोलताना दिली.
राज्य शासनाने अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या एमएचटी सीईटी २०१३ चा निकाल सोमवारी केला. ही परीक्षा ९ ते २० मे दरम्यान घेण्यात आली होती. राज्यात पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख १३ हजार ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पीसीबी ग्रुपसाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर २ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन्ही ग्रुपमध्ये एकूण ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातील ५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत दोन्ही ग्रुपमधील २८ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेटाईल मिळविले. त्यात छत्रपती संभाजीनगरमधील एकमेव चैतन्य विश्वास ब्रह्मपुरीकर या विद्यार्थ्याचा समावेश आहे. तो स. भु. विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याने ऑनलाईन पद्धतीनेच शिकवणी लावली होती. महाविद्यालय आणि ऑनलाईन शिकवणीतूनच त्याने हे यश मिळविल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले. त्याची आई एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका असून, वडिलांचे ९ वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे. आईने केलेल्या मार्गदर्शनातून त्याने हे यश मिळविले असल्याचे त्याने सांगितले.
चैतन्यला आयआयटीमध्ये घ्यायचाय प्रवेशचैतन्यने जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिली असून,त्याचा निकाल १८ जून रोजी लागणार आहे. त्याचे लक्ष जेईईच्या निकालाकडे आहे. त्याला नामांकित आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा असल्याचेही त्याने सांगितले. आयआयटीमध्ये प्रवेश मिळणार असल्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला.
विमुक्त जाती, जमातीत अखिलेशसिंगची बाजीएमएचटी सीईटीमध्ये विमुक्त जाती, जमाती प्रवर्गात शहरातील अखिलेशसिंग परदेशी याने ९९.९२ पर्सेंटाईल मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने हे यश पीसीबी ग्रुपमध्ये मिळविले आहे.