लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी (दि.१७) सकाळी १० वाजता वीज गुल झाल्याने ८५ युनिटचे कामकाज तासभर ठप्प झाले. एका फिडरमुळे दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे उद्योजकांनी म्हटले.चिकलठाण्यातील रेडियंट अॅग्रो फिडरसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांकडून पाठपुरावा सुरूआहे; परंतु त्यावर काहीही तोडगा निघत नाही, त्यामुळे या फिडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वेळेवर वीज बिल भरण्यास प्राधान्य दिले जाते; परंतु त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांकडून होत आहे. या अडचणींमुळे १० जुलै रोजी उद्योजकांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्याची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी चिकलठाणा एमआयडीसीत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो. येथील रेडियंट अॅग्रो आणि अन्य फिडरची दुरुस्ती करण्यात यावी, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दुरुस्ती व देखभाल केंद्र सुरूकरणे, वाळूज येथील गट क्रमांक २२ व २३ मधील उद्योजकांना वीजपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त फिडरची व्यवस्था करणे, पावसाळ्यात पुरवठा सुरळीत राहील यासाठी दक्षता घेणे, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले; परंतु अद्यापही दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरूच आहे.पावसामुळे सोमवारी रात्रीदेखील येथील पुरवठा तासभर बंद झाला होता. त्यानंतर रेडियंट अॅग्रो फिडरमधील नादुरुस्तीने मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वीजपुरवठा बंद पडला. तासभर वीजपुरवठा बंद होता, त्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे उद्योजकांनी म्हटले. वीज गेल्यानंतर उद्योजकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा यंत्रणा जुनी झाल्याचे अजब उत्तर देण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले. नादुरुस्तीमुळे फिडर बंद पडले होते. तात्काळ दुरुस्ती करण्यात आल्याचे महावितरणच्या अभियंत्यांनी सांगितले.
विजेच्या लपंडावाने एमआयडीसी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:09 AM