औरंगाबाद : ‘अत्याधुनिक दळणवळणाच्या सुविधा असतील, तर बहुराष्ट्रीय कंपन्या ‘डीएमआयसी’मध्ये गुंतवणूक करण्यास धजावतील. हे ठाऊक असतानाही ‘सुपर एक्स्प्रेस वे’ अर्थात समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा भार कोणी उचलायचा, यावर एमआयडीसीच्या संचालक मंडळाचे अद्याप एकमत झालेले नाही. दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतेच समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीसाठी ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक ‘एमआयडीसी’ला दिले आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत औरंगाबादेत झपाट्याने विकसित होत आहे. ‘डीएमआयसी’च्या शेंद्रा इंडस्ट्रिअल बेल्टमध्ये सध्या मोठ्या सहा कंपन्या सुरू झाल्या आहेत. तेथे जवळपास ६१ उद्योगांनी जागा ताब्यात घेतल्या आहेत. या तुलनेत बिडकीन इंडस्ट्रिअल बेल्टमध्ये पायाभूत विकासाची कामे झालेली आहेत. मात्र, तेथे अद्याप एकही उद्योग सुरू झालेला नाही. तथापि, रेल्वे आणि विमानसेवा ‘डीएमआयसी’पासून हाकेच्या अंतरावर आहेत.
शेंद्रा इंडस्ट्रिअल बेल्टपासून समृद्ध महामार्गाला कनेक्टिव्हिटी मिळाल्यास जलदगतीने दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. ज्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदार ‘डीएमआयसी’मध्ये गुंतवणुकीसाठी पुढे येतील, या हेतूने कनेक्टिव्हिटीचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, मागील सहा महिन्यांपासून यावर केवळ चर्चाच होत आहे. शेंद्रा ते समृद्धी महामार्गापर्यंतचा भूसंपादन व रस्त्याच्या कामाचा खर्च एमआयडीसीने करावा, या अटीवर ‘एमएसआरडीसी’ने कनेक्टिव्हिटी देण्यास तयारी दाखवली असून, नुकतेच रस्त्याच्या कामासाठी ४१ कोटींचे अंदाजपत्रक, रस्त्याचे डिझाईन एमआयडीसीला सादर केले आहे.