वाळूज महानगर : वाल्मी रस्त्यावरील एमआयडीसीची जलवाहिनी रविवारी सायंकाळी पुन्हा फुटली. पाण्याचा दाब जास्त असल्याने जलवाहिनीतून पाण्याचे फवारे उडत असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रासह या परिसरातील नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणारी वाल्मी रस्त्यावरील एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली. सायंकाळी ५ वाजेपासून सुरू असलेली गळती रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. नागरिकांनी जलवाहिनीला कपडा बांधून पाणी थांबविण्याचा प्रयत्न केला; पण पाण्याचा दाब जास्त असल्याने नागरिकांचे प्रयत्न अयशस्वी झाले.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने एमआयडीसीचे अधिकारीही याकडे फिरकले नाहीत. रात्री उशिरापर्यंत गळती सुरू असल्याने शेकडो लिटर पाणी खाली वाहून गेले. नुकतीच एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती केली आहे; पण जलवाहिनी पुन्हा फुटल्याने दुरुस्तीच्या कामाविषयी नागरिकांमधून शंका उपस्थित केली जात आहे. ऐन टंचाईच्या काळात पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.