औरंगाबाद : दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर दाखल केलेली गुन्हे सौम्य कलमांखाली आहेत. राणा दाम्पत्यांवर केवळ हनुमान चालीसा पठण करणार म्हणून देशद्रोहाचा गुन्हा तर राज ठाकरेंवर का नाही ? राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्यानेच गृहविभागाच्या आदेशाने सहज जामीन मिळणारी कलमे लावल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी आज केला.
राज ठाकरे यांनी १ मे रोजी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली. १६ अटींचे पालन करण्याच्या हमीवर सभेला परवानगी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी भाषणाचा अभ्यास करून त्याचा अहवाल गृह विभागाला दिला. त्यानंतरच्या आदेशाने पोलिसांनी राज ठाकरे, सभेचे आयोजक राजू जावळेकर आणि इतरांवर भादंवि कलम ११६, ११७, १५३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अभिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कलमांवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता आक्षेप घेतला आहे.राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यामुळे त्यांच्यावर १५३ -अ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र, राज ठाकरे यांच्या भाषणाचा तीन दिवस अभ्यास करून पोलिसांनी खूप सौम्य गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्याने गृह विभागाच्या आदेशाने अशी कलमे लावण्यात आली, असा आरोप खासदार जलील यांनी केला.
राज ठाकरेंची पुढे गरज पडणार म्हणून नियम सर्वांसाठी एक आहेत. राणा दाम्पत्यांवर देशद्रोह तर हजारो लोकांसमोर प्रक्षोभक भाषण देणाऱ्या राज ठाकरेंवर सौम्य कलमे का लावली ? असा सवालही जलील यांनी गृह विभागाला केला. या दोन्ही घटनात काय वेगळे आहे याचे उत्तर सरकारने द्यावे असेही जलील म्हणाले. सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीनंतर असा निर्णय घेण्यात आला कारण पुढील राजकारणात राज ठाकरेंची गरज पडू शकते असा अंदाज सत्ताधाऱ्यांना आहे. यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थानिक पोलिसांचा नकार असतानाही सुरुवातीला सभेला त्याच मैदानावर परवानगी दिली, तर सभेनंतर पोलिसांच्या अहवालानंतरही साधी कलमे लावण्याचे आदेश दिल्याचा आदेशही खा. जलील यांनी केला.