औरंगाबाद : मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडून विकत घेऊन त्यांना मारहाण करून भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या माय-लेकीला मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. जनाबाई उत्तम जाधव (५९) आणि सविता संतोष पगारे (३३, दोघी रा. रामनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते देवराज वीर यांना नातेवाईक महिलेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता रामनगर येथे आरोपी महिला जनाबाई जाधव व सविता पगारे या दोघी ५ वर्षांच्या मुलाला बेलण्याने मारहाण करीत होत्या. ही माहिती समाजताच वीर यांनी त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. त्याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी दोन्ही महिलांसह पीडित मुलाला पोलीस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी बालकल्याण संरक्षण कक्षाच्या महिला अधिकारी ॲड. सुप्रिया इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बाजारे, कैलास पंडित यांनी पीडित मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आरोपी महिलांनी भीक मागण्यासाठी विकत आणले असल्याचे सांगितले, तसेच भीक मागण्यासाठी नकार दिल्यास त्या मारहाण करीत असल्याचेही पीडित मुलाने सांगितले. यानंतर वीर यांच्या फिर्यादीवरून दोन महिलांच्या विराेधात गुन्हा दाखल केला. या दोघींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीकांत भराटे करीत आहेत.
चौकट..............
दीड लाखात दोघांना घेतले विकत
पोलिसांनी आरोपी महिलांची विचारपूस केली असता, त्यांनी ५ वर्षांच्या मुलाला ५५ हजारांत आणि जालन्यातील २ वर्षांच्या मुलाला १ लाख रुपयांमध्ये त्यांच्या आई-वडिलांकडून विकत घेतल्याची माहिती दिली. मुलांना विकत घेतल्याचा लेखी करारही १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर झाला असल्याची माहिती आरोपी महिलांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस बॉण्डवरील साक्षीदारासह यात आणखी कोणी आहे का, याचा तपास करीत आहेत.