औरंगाबाद - मिटमिटाप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या निर्णयानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे प्रभारी पोलीस आयुक्तपद सोपवण्यात आले आहे. मागील काही महिन्यांत काही कारणाने शहर संवेदनशील बनले आहे. कचराकोंडीमुळे शहरवासीयांचीच नव्हे तर पोलीस विभागाचीही झोप उडाली आहे. कोणत्याहीक्षणी कायदा- सुव्यवस्था भंग होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्या खांद्यावर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसोबत आता शहर आयुक्तालयाची जबाबदारी आली आहे. गुरुवारी (15 मार्च) सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी प्रभारी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. रात्री त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन अधिका-यांना सूचना दिल्या.
पुण्यातील भीमा कोरेगावच्या घटनेनंतर शहरात 1 ते 2 जानेवारीदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक, जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही पोलीस आयुक्त यशस्वी यादव रजेवर होते. तेव्हाही भारंबे यांनी शहराची परिस्थिती नियंत्रणात आणली होती.