औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक होऊन संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सूचनेनुसार दूध खरेदी दरात १ जूनपासून प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३.५ व ८.५ च्या दुधाला प्रतिलिटर २५ रु. असा दर राहील. पिशवीमधील दूध व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.सध्या दुष्काळी परिस्थिती असून, चाऱ्याच्या भावातही वाढ झाली आहे. पशुखाद्याचे दरही वाढले आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून ही दरवाढ करण्यात आली असल्याचे दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी कळविले आहे.संचालक मंडळाच्या बैठकीस कचरूडिके, पुंडलिक काजे, राजेंद्र पाथ्रीकर, दिलीप निरपळ, गोकुळसिंग राजपूत, राजेंद्र जैस्वाल, प्रभाकर सुरडकर, शीलाबाई कोळगे, हिराबाई सोटम, सविता आधाने, कुशीवर्ता बडक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील आदींची उपस्थिती होती.
दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:16 PM