औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला सोमवारी सोने, चांदी, चारचाकी, दुचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. मुहूर्त साधत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या उत्साहामुळे दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.अक्षयतृतीयेच्या दिवसाचे औचित्य साधून नवीन खरेदी क रण्यावर भर दिला जातो. त्यामुळे बाजारपेठेमध्ये उत्साह दिसून आला. विविध खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होती. सायंकाळी तर बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. गुंजभर तरी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त साधला जातो. अशा परिस्थितीत सोन्याच्या भावात तेजी-मंदीचा कोणताही विचार न करता खरेदीसाठी सराफा दुकानांमध्ये महिलांनी गर्दी केली होती. महिन्याचे बजेट सांभाळून दागिन्यांची खरेदी करण्यात आली.चारचाकी खरेदी आणि बुकिंग करण्यावरही अनेकांनी भर दिला; परंतु अन्य मुहूर्तांच्या तुलनेत यंदा चारचाकी वाहन खरेदी करण्याचे प्रमाण कमी राहिले, असे सचिन मुळे यांनी सांगितले. फ्रीज, एसी, कूलर, फॅन या उन्हाळा सुसह्य करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह टीव्हीची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली, असे अरुण जाधव यांनी सांगितले. मोबाईल खरेदीसाठीही ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली. यात स्मार्ट फोनची खरेदी करण्याकडे युवा वर्गाचा कल दिसून आला. तरीही अन्य मुहूर्तांच्या तुलनेत मोबाईल विक्री कमी झाल्याचे ज्ञानेश्वरअप्पा खर्डे यांनी सांगितले. फ्लॅटची बुकिंग करण्यावरही अनेकांनी भर दिला.
अक्षयतृतीयेला बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2016 12:43 AM