सोयगाव ( औरंगाबाद ) : अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात पाण्याअभावी तडफडून शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आली. वाढत्या उन्हामुळे जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून, धरण परिसरही कोरडाठाक झाल्याने पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सोयगाव वनक्षेत्रात घनदाट झाडी असल्याने या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. काही पाहुणे पक्षीही अजिंठा डोंगरात वास्तव्यास आहेत; परंतु महिनाभरापासून उन्हाचे चटके वाढल्याने जंगलात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. शेत शिवारातील विहिरीही कोरड्याठाक पडल्या आहेत. पिण्यासाठी पाणीच नसल्याने काही पक्ष्यांनी झाडावरील घरट्यातच जीव सोडल्याची दुर्दैवी घटना यातून आज उघडकीस आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत वन विभाग या घटनेबाबत अनभिज्ञ होता. त्यामुळे पशुप्रेमींमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. झाडाखाली मृत पक्ष्यांचा सडाच आढळला. काही पक्षी घरट्यातच मृत झालेले दिसले. धीवर, चिमण्या, कावळे, बगळे, तुतारी, सुगरण, कबुतर आदी विविध पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले असताना वनविभाग मात्र डोळे झाकून आहे. वाढते ऊन व पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे अजिंठ्याच्या डोंगररांगांतील पक्ष्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
पाणवठे कोरडेठाक, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीलासोयगाव वनपरिक्षेत्रात असलेले दहा पाणवठे कोरडेठाक झाले आहेत. महिनाभरापासून या वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे बिबट्या, मोर, हरीण, नीलगाय व पक्ष्यांच्या घशाची कोरड अद्यापही दूर झालेली नाही. जंगलात पाणीच नसल्याने वानराच्या टोळ्याही गाव शिवारात येत आहेत. गावात साठवून ठेवलेले पाणी पिण्यासाठी वानरांच्या टोळ्यांनी गावात धुमाकूळ सुरूकेला आहे. हरीण, मोरांनी शेत शिवारात वास्तव्य केले आहे. पाण्याअभावी वन्य प्राणी गोंधळात पडले असून, त्यांच्या जिवाची घालमेल होत आहे. उन्हाची तीव्रता आणि पाण्याची दुर्मिळता वन्य प्राण्यांकडून सोसवत नसल्याचे या घटनेवरून लक्षात आले.