- मुजीब देवणीकर /शेख महेमूद
औरंगाबाद/वाळूज महानगर : औरंगाबाद शहरात प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमाच्या एक दिवस अगोदर शुक्रवारची विशेष नमाज अदा करण्यासाठी लाखो साथींचा जनसागर उसळला होता. दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहाब यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी ‘जुमा’ची विशेष नमाज अदा केली. यानंतर मौलाना साद यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
औरंगाबाद शहरापासून अवघ्या २४ किलोमीटर अंतरावर लिंबेजळगाव येथे इज्तेमाचे आयोजन केले आहे. इज्तेमासाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासूनच हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव औरंगाबाद शहरात दाखल होत होते. बाबा पेट्रोलपंप ते इज्तेमा स्थळापर्यंतचा रस्ता वाहनांनी ओसंडून वाहत होता. दुपारी १२ वाजेपासून या रस्त्यावर लांबलचक रांगाच रांगा लागल्या होत्या. दुपारी १.३० पूर्वी नमाजला पोहोचण्यासाठी साथींची धडपड सुरू होती. शहरापासून इज्तेमास्थळापर्यंत ‘खिदमतगार’ हजारो तरुणांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले. त्यांच्या या कामामुळे वाहने अत्यंत शिस्तीत ये-जा करीत होती.
हजरत मौलाना साद यांच्यावर पुष्पवृष्टीइज्तेमासाठी दिल्ली मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहाब शुक्रवारी अहमदनगरमार्गे लिंबेजळगावला इज्तेमासाठी हजर झाले. सकाळी अहमदनगरच्या रेल्वेस्थानकावर हजारो मुस्लिम बांधवांनी हजरत मौलाना साद साहाब यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर हजरत साद साहाब यांचे अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर ठिकठिकाणी गुलाबाची पुष्पवृष्टी करून मुस्लिम बांधवांनी स्वागत केले.
‘जुमा’ची नमाज अदाशुक्रवारी हजरत मौलाना साद साहाब यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो मुस्लिम बांधवानी ‘जुमा’ची नमाज अदा केली. नमाजपूर्वी हजरत साद साहाब यांनी ‘खुतबा’ वाचन केल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. मुख्य सभा मंडपात अलोट गर्दी झाल्याने हजारो मुस्लिम बांधवांनी मोकळ्या मैदानावर नमाज अदा केली. नमाज नंतर हजरत साद साहाब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सर्व सुविधांयुक्त इज्तेमा परिसरया राज्यस्तरीय इज्तेमासाठी जवळपास ९० लाख चौरस फुटांचा भव्य शामियाना उभारण्यात आला असून, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन लगतच छोटे-छोटे शामियाने उभारण्यात आले आहेत. इज्तेमास्थळी ये-जा करण्यासाठी १०० फुटांचे दोन मुख्य रस्ते तयार करण्यात आले आहेत. वाहनांच्या पार्किंगसाठी जवळपास १४०० एकर जागेवर जिल्हानिहाय व्यवस्था केली आहे. या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात २५ हजार नळांची, तसेच ५ हजार स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी स्नान करण्यासाठी जवळपास १५०० प्रसाधनगृहे, जेवणासाठी २ हजार ५०० हॉटेलची व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी एमआयडीसीच्या स्टॅन्ड पोस्टवरून टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुस्लिम बांधवांत जनजागृतीहजरत मौलाना साद साहाब व प्रमुख उलेमांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर इज्तेमाला सुरुवात करण्यात येणार आहे. नमाजनंतर प्रमुख उलेमा ‘उमुमी’ बयाण करणार आहेत. दुपारी ‘जोहर’च्या नमाजनंतर बयाण, सायंकाळी ‘असर’च्या नमाजनंतर बयाण व मगरीबच्या नमाजनंतर प्रमुख उलेमा बयाणद्वारे मुस्लिम बांधवांत जनजागृती करणार आहेत.
विदेशी मुस्लिम बांधवइज्तेमासाठी देश-विदेशातून मुस्लिम बांधवांचे जथे दाखल होत आहेत. या इज्तेमाच्या पूर्वतयारी व इज्तेमाची ‘दावत’ देण्यासाठी राज्यभरातून निघालेल्या हजारो ‘जमात’चे इज्तेमास्थळी आगमन झाले आहे. गत दोन दिवसांपासून विविध भागांतून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या इज्तेमास्थळी पोहोचत आहेत.
भाविक भारावलेइज्तेमासाठी आलेल्या भाविकांसाठी संयोजकांच्या वतीने चहा-नाष्टा, जेवण, शुद्ध पाणी, प्रसाधनगृह आदींची चोख व्यवस्था केली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी शामियानात जिल्हानिहाय विशेष क्रमांक टाकण्यात आले असल्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातून येणारे भाविक आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी थांबले आहेत. रुग्णालय, औषधी, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब, तज्ज्ञ डॉक्टर्स आदींची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ही व्यवस्था पाहून भाविक प्रचंड भारावले आहेत.
इज्तेमासाठी पोलीस बंदोबस्त लिंबेजळगाव येथे शनिवारपासून सुरू होणाºया तीनदिवसीय इज्तेमाच्या सुरक्षेसाठी १० उपायुक्त, २३ सहायक आयुक्तांसह २८४ पोलीस अधिकारी आणि चार हजार पोलीस तैनात करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पोलीस आयुक्त म्हणाले की, इज्तेमासाठी देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. बहुतेक सर्वच चारचाकी वाहनाने येतील. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शुक्रवारी दुपारपासूनच या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविली. सामान्यांना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. इज्तेमाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तेथे स्वतंत्र कंट्रोलरूम तयार केली. बॉॅम्बशोधक आणि नाशकची (बीडीडीएस) बाहेरून आलेली सहा आणि शहरातील तीन, अशी नऊ पथके तेथे तैनात करण्यात आली. या पथकांकडून परिसराची कसून तपासणी केली जात आहे.
याशिवाय विविध ठिकाणांहून ८ तर शहरातील २, असे दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाचे तब्बल २०८ अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस कॉन्स्टेबलपदावरील १ हजार ७०० जणांना विविध जिल्ह्यांतून बोलावण्यात आले आहे. शहर पोलीस दलातील २ हजार पोलीस कर्मचाºयांसह ते बंदोबस्ताचे काम करतील.