सुनील कच्छवे, औरंगाबादसिंचन घोटाळ्यामुळे वादात सापडलेल्या जलसंपदा खात्यात किती तरी बाबींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात निव्वळ सल्ल्याच्या नावावर दरवर्षी लाखो रुपयांचा निधी जिरत आहे. मागील पाच वर्षांत महामंडळात केवळ सल्ल्यासाठी तब्बल १ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविल्याची माहिती हाती आली आहे.गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या स्रोतांचे व्यवस्थापन करण्याच्या हेतूने १९९८ साली जलसंपदा खात्यांतर्गत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. तेव्हापासून या महामंडळाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यातील धरणांचे बांधकाम, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचे काम होते. त्यासाठी महामंडळाला दरवर्षी हजार ते बाराशे कोटी रुपयांचा निधी मिळतो. मात्र, हा निधी केवळ बांधकामावरच नाही तर अनेक बाबींवर खर्च केला जातो. त्यात गेल्या काही वर्षांपासून महामंडळातील अधिकाऱ्यांकडून सल्ल्यासारख्या बाबींवर खूप मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे.हाती आलेल्या कागदपत्रांनुसार महामंडळाने २००९ पासून २०१३ सालापर्यंत दरवर्षी सरासरी २० लाख रुपये सल्ल्यावर खर्च झाल्याचे दाखविले आहे. या पाच वर्षांत २०१२ साली सर्वाधिक ६० लाख रुपये सल्ल्यावर खर्च झाल्याचे दर्शविले आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात असंख्य तज्ज्ञ अधिकारी आहेत. शिवाय महामंडळांतर्गत वर्षानुवर्षे तेच ते प्रकल्प सुरू आहेत. मागील काही वर्षांपासून महामंडळाने कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेतलेले नाहीत. त्यामुळे महामंडळाला सल्ला घेण्याची काय गरज पडली किंवा गरज पडलीच तर त्यावर एवढा खर्च कसा झाला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सल्ल्यावर दर्शविलेल्या लाखो रुपयांच्या खर्चाविषयी महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांच्याकडे विचारणा केली. त्यावर हा खर्च कसा झाला, तो सल्ला कुणाकडून व कशासाठी घेतला गेला याविषयी सध्या आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. परंतु कदाचित कायदेशीर सल्ल्यासाठी हा खर्च झालेला असावा, असा अंदाजही त्यांनी वर्तविला.
सिंचनाच्या सल्ल्यावर लाखोंचा निधी खर्च
By admin | Published: April 24, 2016 11:40 PM