औरंगाबाद: विमान कंपनीचा गुगलवर ग्राहक सेवा क्रमांक शोधणे एका जणाला तब्बल एक लाखात पडले. बनावट ग्राहक सेवा नंबरवरुन बोलणाऱ्या भामट्याने गोडबोलून त्यांच्या खात्यातील एक लाख रुपये परस्पर ऑनलाईन काढून फसवणूक केल्याचे समोर आले.
सायबर पोलिसानी सांगितले की, तक्रारदार पवनकुमार धृव सिंग (रा. आर. बी. हिल, गारखेडा परिसर) हे औरंगाबादेतील एका कंपनीत नोकरी करतात. त्यांनी दिल्ली येथे जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुकींग केले होते. वैयक्तिक कारणास्तव त्यांना बुकिंग केलेल्या दिवशी प्रवास करणे शक्य नव्हते. यामुळे त्यांनी प्रवासाच्या तारखेत बदल करायचे ठरविले आणि विमान कंपनीच्या ग्राहक सेवा सेंटरचा (कस्टमर केअर क्रमांक) फोन नंबरचा गुगलवर शोध घेतला. तेथे मिळालेल्या एका क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये टीम व्ह्युवर हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
तक्रारदार यांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करताच आरोपीने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेतला आणि त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख रुपये ऑनलाईन पध्दतीने परस्पर काढून घेतले. ही बाब तक्रारदार यांना समजताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक गीता बागवडे तपास करीत आहेत.