औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) व वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती संपुष्टात आली आहे. वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देत असल्याचे सविस्तर पत्रच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धीस दिले. जागावाटपावरून बिनसल्याने हा निर्णय घेतल्याचे जलील यांनी म्हटले आहे. मात्र, जलील यांचा निर्णय मान्य नसून, आम्ही असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करू, असे वंचित आघाडीने म्हटले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २३ जागांवर उमेदवार उभे केले होते. औरंगाबाद मध्य व मुंबईत एका जागेवर त्यांना यश मिळाले. आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी एमआयएमने युती केली. राज्यात ४८ जागांवर युतीने उमेदवार उभे केले. युतीचा फायदा प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर, अकोला येथे झालाच नाही. उलट वंचितचा फायदा एमआयएमला झाला. औरंगाबादेत इम्तियाज जलील वंचितच्या पाठिंब्यावर निवडून आले. तेव्हापासून दोन्ही पक्षांत सुंदोपसुंदी सुरू झाली.
अलीकडेच पुण्यात प्रकाश आंबेडकर व खा. ओवेसी यांची विधानसभांच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली; पण अंतिम निर्णय झाला नव्हता. नंतर चर्चेच्या दोन फेऱ्यांत वंचितने एमआयएमला आठ जागा देऊ केल्या. औरंगाबाद मध्यचाही यात समावेश नव्हता. आठ दिवसांपासून दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले आहेत. शुक्रवारी जलील यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत असल्याचे पत्रक काढून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली. दरम्यान, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा खा. जलील यांनी केली असली तरी असदुद्दीन ओवेसी जाहीर करीत नाही तोपर्यंत एमआयएम वंचितसोबतच असल्याचे वंचितचे प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी म्हटले आहे.
...तोवर युती कायमवंचितने खा. जलील यांच्या वक्तव्याला महत्त्व न देण्याचे ठरविले आहे. जोपर्यंत असदुद्दीन ओवेसी युती तुटल्याचे सांगत नाहीत, वा तसे पत्र देत नाहीत तोवर एमआयएमची युती आहे, असेच आम्ही मानतो, असे वंचित आघाडीने पत्रकाद्वारे म्हटले आहे. ओवेसी यांनी विधानसभेसाठी १७ जागांची यादी पाठविली होती. या १७ जागांबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ओवेसींकडून युती तुटल्याचा संदेश वा पत्रही मिळालेला नाही. त्यामुळे युती आहे असेच आम्ही मानतो, असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही वंचित आघाडीने जलील यांना महत्त्व न देण्याचेच ठरवले होते. आंबेडकर यांनी चर्चा फक्त ओवेसी यांच्याशी केली जाईल, असे म्हटले होते.