महापालिकेने शहरातील कचरा संकलनाचे काम पी.गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. मात्र, कंपनीच्या विरोधात प्रचंड तक्रारी सुरू आहेत. प्रभाग ३ मध्ये कचरा संकलनाचे काम जवळपास कोलमडले आहे. वाहने कमी असल्याने अनेक भागांत कचरा पडून असतो, कर्मचारी कमी असल्याचे कारण कंपनीकडून देण्यात येते. संतप्त एमआयएम पदाधिकाऱ्यांनी सोमवारी थेट वॉर्ड कार्यालयाला टाळे ठोकले. भोंबे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. कचरा संकलन करणारी अनेक वाहने नादुरुस्त आहेत. यामुळे अडचण आहे. कंपनीच्या काही वाहनांचे येत्या चार दिवसांत पासिंग होणार आहे. त्यानंतर, कचऱ्याची समस्या सुटेल. यावेळी माजी नगरसेवक नासिर सिद्दिकी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
डिसेंबर अखेर पुतळा बसविण्यात येईल
औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिसेंबरपर्यंत बसविण्यात येईल, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती २१ फूट उंच व २२ फूट लांब आणि ६ टन वजनाचा पुतळा पुण्यात तयार होत आहे. चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनविलेल्या या पुतळ्याची पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी महापालिका अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली होती. या संदर्भात पांडेय यांनी सांगितले की, पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारी, २०२२ मध्ये क्रांती चौकातील पुतळा बसविला जाईल. स्मार्ट सिटी अभियानातून क्रांती चौकात सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. सुशोभीकरण होईपर्यंत पुतळ्याचे कामही पूर्ण होईल, असे त्यांनी नमूद केले.