शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ८ जून रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी शिवसेनेनं सुरू केली असून आज सभेच्या ठिकाणी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्तंभ पूजन केलं. उद्धव ठाकरेंच्या याच सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली आहे. औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून येथील नागरिकांना आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भुलवणं कठीण आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.
"उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील पण औरंगाबादला पाणी देऊ शकणार नाहीत. ते फक्त इथं देऊन धर्माचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा काढणार आहेत. ज्या शहराला ते महापुरुषाचं नाव देत आहेत. त्या शहराला सध्या दहा दिवसांच्याआड पाणी येत आहे. याचा ते विचारही करत नाहीयत. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराला पाणी कधी मिळणार याची नेमकी तारीख जाहीर केली तर ज्या मार्गानं ते जाणार आहेत. त्या मार्गावर फुलांची उधळण आम्ही करू", असं आव्हान इम्तियाज जलील यांनी दिलं आहे.
चंद्रकांत खैरेंच्या आरोपांनाही दिलं उत्तरएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला भाजपाने एक हजार कोटी रुपये दिले होते. निवडणुकीत शिवसेनेची मतं खाण्यासाठी हे पैसे दिले गेले होते असा आरोप खैरेंनी केला. त्यावर आज इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलं. "आम्हाला एक हजार नाही, तर दहा हजार कोटी रुपये दिले होते. हे पैसे स्वत: चंद्रकांत खैरे यांनी आणून दिले होते आणि त्यात ५०० रुपयाच्या चार नोटा कमी होत्या. खैरेंनी चहा पाण्यासाठी त्या ठेवून घेतल्या होत्या. त्यांनी अजूनही त्या परत केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी त्या परत कराव्यात नाहीतर आम्ही ईडीकडे तक्रार करू", असा खोचक टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.