औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील एमआयएमचे आहेत मात्र, भाषण केल्यानंतर भाजपचे वाटतात, अशी मिश्कील टिपण्णी रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज भाषणात केली. यामुळे भाजपता जाणार का असा प्रश्न खा. इम्तियाज जलील यांना विचारण्यात आला. भाजपात जाण्या ऐवढे मोठे मोठे पाप मी करणार नाही, असे सडेतोड प्रत्युत्तर खा. जलील यांनी दिले.
औरंगाबाद येथील पिटलाईनच्या कामाचे आज रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, खा. इम्तियाज जलील, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती. यावेळी खा. जलील यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने चांगली कामे सुरु आहेत. आमचा विकास कामांना पाठिंबा आहे असे मनोगत व्यक्त केले. हाच धागा पकडून रेल्वेराज्यमंत्री दानवे यांनी, खा. जलील खासदार आहेत एमआयएमचे मात्र भाषणानंतर वाटतात भाजपचे, अशी मिश्कील टिप्पणी भाषणात केली. यामुळे खा. जलील यांना भाजपात येण्याचे निमंत्रण मिळाल्याची चर्चा सुरु झाली.
कार्यक्रमानंतर खा. जलील यांना याबाबत विचारण्यात आले. तेव्हा जलील म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वांसोबत काम करण्यास तयार आहोत. मराठवाड्यातील रेल्वेचा विकास व्हावा. निझामामुळे रेल्वेचा विकास झाला नाही असे म्हणणे चुकीचे ठरले. ७० वर्षानंतरही निझामाच्या नावे रडणे सोडावे, सातत्याने केंद्र सरकारच्या दुर्लक्षाने विकास खुंटला असा आरोपही खा. जलील यांनी केला. तसेच मी भाजपमध्ये जाण्याऐवढे मोठे पाप कधीच करणार नाही, असे सडेतोड प्रत्युत्तरही खा. जलील यांनी मंत्री दानवे यांच्या विधानावर यावेळी दिले.