औरंगाबाद : पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल एमआयएम पक्षाने आतापर्यंत एकूण नऊ नगरसेवकांची हकालपट्टी केली आहे. महापालिकेत संख्याबळानुसार एमआयएम पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळाले होते. मंगळवारी झालेल्या उपमहापौर निवडणुकीत एमआयएमचे संख्याबळ २५ वरून थेट १३ वर आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाऊ शकतो का? याची चाचपणी भाजपने सुरू केली आहे. विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या गटानुसार एमआयएमने हकालपट्टी केलेल्या नगरसेवकांची नावे कमी करावी लागतील. त्यानंतरच भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते.
२०१५ मध्ये मनपा निवडणुकीत सेनेला २९, एमआयएमला २५ जागा मिळाल्या. भाजपच्या पारड्यात २३ जागा आल्या. संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपद एमआयएमकडे गेले. मागील साडेचार वर्षात वेगवेगळ्या कारणांनी एमआयएमची सदस्य संख्या कमी कमी होत गेली आहे. सर्वात आधी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने बुढीलेन येथील नगरसेविकेला आपले सदस्यत्व गमवावे लागले. पोटनिवडणुकीत तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे एमआयएमची संख्या २४ वर आली होती.त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षविरोधी कारवाया आणि पक्षशिस्त न पाळल्याच्या कारणावरून पक्षाने सय्यद मतीन, तसनीम बेगम आणि जहांगीर खान ऊर्फ अज्जू पहेलवान यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे ही संख्या २२ वर आली. आता उपमहापौर निवडणुकीत पक्षादेश न पाळल्याच्या कारणाने मंगळवारी सायरा बानो, संगीता वाघुले, नसीमबी सांडू खान, विकास एडके, शेख समिना आणि सलीमा बाबूभाई कुरेशी या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आता एमआयएमचे मनपातील संख्याबळ १६ वर आले आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजप नुकताच मनपाच्या अर्ध्या सत्तेतून बाहेर पडला आहे. महापालिकेत भाजपचे २३ नगरसेवक आहेत. त्यामुळे आता संख्याबळाच्या जोरावर भाजपने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची तयारी चालविली आहे.
कायदेशीर तांत्रिक बाजू तपासणे सुरू
एमआयएमचे संख्याबळ आमच्यापेक्षा कमी झाले आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळू शकते. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली जाईल. तसेच कायदेशीर तांत्रिक बाबीही तपासण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जणार आहे. - प्रमोद राठोड, गटनेता भाजप..........................