औरंगाबाद : मध्य मतदारसंघातील एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांची भाजप आणि शिवसेनेशी जवळीक वाढू लागली आहे. किंबहुना आ. जलील यांनाच सोबत घेऊन युतीचे मंत्री व आमदार राजकीय आखाड्याबाबत चर्चा करताना दिसू लागले आहेत. एमआयएम आमदाराची विशेष करून भाजपसोबत जवळीक वाढल्यामुळे ‘काही तरी शिजतंय’ अशी चर्चा सुरू झाली आहे.
२०१४ मध्ये मध्य मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप उमेदवाराच्या मतविभाजनाच्या समीकरणात जलील यांना लॉटरी लागली आणि ते विधानसभेत पोहोचले; परंतु त्यांनी युतीसोबत सलगीचे धोरण स्वीकारत २०१४ पासून आजपर्यंत राजकारण सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभेनंतर आ. जलील यांची राजकीय वर्तुळातील ‘बॉडी लँग्वेज’ पूर्णपणे बदलली आहे. अतिआत्मविश्वास आणि राजकीय समीकरणांच्या कावेबाजीमुळे त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे.
पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि आ. जलील यांचे विशेष सूत जुळले होते. कदमांनी त्यांच्या मतदारसंघात विशेष निधी देत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासोबतही त्यांची जवळीक आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत आमदार निमंत्रित नसताना भाजपचे सहकारी असल्यासारखे आ. जलील बैठकीत बसले होते.
शिवाय डीपीसी सभागृहाच्या व्हरांड्यात मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे आणि आ. जलील यांच्यात मनपाच्या राजकारणावरून हास्यकल्लोळ सुरू होता. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यांनी दुष्काळासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीलाही युतीचे वगळता विरोधी पक्षातील केवळ आ. जलील यांनी उपस्थिती लावली.भाजपच्या मंत्र्यांसोबत ‘चाय पे चर्चा’पुरवठामंत्री गिरीश बापट सोमवारी शहरात होते. त्यांनी दिवसभर पुरवठा विभाग आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या बैठका घेतल्या. आ. जलील यांनी बापटांशी पुण्यापासून असलेली जवळीक साधत विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकींना हजेरी लावली. बैठकीला विरोधी पक्षातील एकही आमदार उपस्थित नव्हता. मात्र आ. जलील हजर होते. शिवाय जुनी मैत्री असल्याचे सांगत बापटही जलील यांच्या निवासस्थानी चहासाठी गेले. सोबत आ. अतुल सावेदेखील होते. राजकीय गोळाबेरजेच्या अनेक चर्चा त्यांच्या निवासस्थानी झाल्याची माहिती समोर येत आहे.