शंभर रुपये दिले तरी एक लीटरपेक्षा कमी पेट्रोल नागरिकांना घ्यावे लागत आहे. डिझेलच्या दरातही मागील काही दिवसांत भरमसाट वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढले. आधीच कोरोना महामारीमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात महागाईचे चटके असह्य झाले आहेत. या महागाईविरोधात एमआयएमतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी धरणे धरण्यात आले. या वेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. खा. जलील यांनीही नेहमीप्रमाणे केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकेची तोफ डागली. लोकसभेच्या येणाऱ्या अधिवेशनात सरकारला वाढती महागाई, कोरोनात नागरिकांचे झालेले हाल आदी मुद्द्यांवर धारेवर धरण्यात येईल. पेट्रोल-डिझेलवरील कर किमान २५ टक्के कमी करण्यात यावेत, या मागणीचे निवेदनही केंद्र शासनाला विभागीय आयुक्तांमार्फत पाठविण्यात आले. या वेळी डॉ. गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर, शहराध्यक्ष शहारेख नक्षबंदी, माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, गंगाधर ढगे, विकास एडके, शेख अजीम यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महागाईविरोधात एमआयएमचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:04 AM