- तारेख शेखकायगाव ( औरंगाबाद ) : एमआयएमच्यावतीने ( MIM Tiranaga Rally ) काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला सकाळी ८.४५ वाजता अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच पोलिसांनी रोखलं. १५ मिनिटे रॅलीला अडविण्यात आल्यानंतर पोलिसांनी खा. इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil)यांच्याशी चर्चा करून रॅलीला पुढे जाऊ दिले.
शनिवारी सकाळी ८.३० मिनिटांनी तिरंगा रॅली औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगावच्या गोदावरी नदीच्या पुलावर पोहोचली. तेथे मराठा आरक्षणासाठी गोदावरीत बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास खा. इम्तियाज जलील यांनी अभिवादन केले. त्यानंतर रॅली पुढे निघाली. यावेळी सुमारे तीनशे वाहनांचा ताफा रॅलीत सामील झाला होता. प्रत्येक वाहनावर तिरंगा लावण्यात आलेला होता. मात्र पूल ओलांडून अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच ८.४५ वाजता पोलिसांनी तिरंगा रॅलीला अडवलं. रॅली पुढे जाऊ शकत नाही असे खा. जलील यांना पोलिसांनी सांगितले. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा हजर होता. रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. हळूहळू या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली.
खा. जलील आणि एमआयएम कार्यकर्ते यांनी औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या दिला. खा. जलील यांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना रॅलीच्या परवानगीबाबत माहिती दिली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पोलिसांनी इतर वाहतुक खुली करून दिली. सुमारे ५ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर खा. जलील यांनी पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. रस्त्यावर इतर वाहतुकीला अडथळे येणार नाही याची काळजी घेऊन रॅलीला पुढे जाऊ देण्यास पोलिसांनी परवानगी दिली. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.