लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचे स्वातंत्र्यदिनी गुपचूप उद्घाटन उरकण्याचा घाट आरोग्य विभागाने रचला आहे. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मंगळवारी उद्घाटनाची जोरदार तयारी करण्यात आली. चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळासह महापालिकेच्या अग्निशमन विभागाने रुग्णालयाला नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.विविध शासकीय कार्यालयांची एनओसी मिळाल्याशिवाय कोणत्याही विकासकामाचे लोकार्पण करू नये, असे संकेत आहेत. मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे वादात अडकलेल्या चिकलठाणा येथील २०० खाटांचे रुग्णालय बांधून सज्ज आहे. या रुग्णालयाला चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळ प्राधिकरणाने अंतिम एनओसी दिलेली नाही. रुग्णालयात २०० रुग्ण उपचार घेणार असतील तर तेथे अग्निशमन यंत्रणा आवश्यक आहे. मनपानेही रुग्णालयास अग्निशमन यंत्रणा उभारली नसल्याने ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. मागील तीन महिन्यांपासून रुग्णालयाचे उद्घाटन उरकण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे. आता तिसऱ्या वेळेस १५ आॅगस्टचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने औरंगाबादेत बुधवारी येत आहेत. या कार्यक्रमानंतर गुपचूप रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा घाट आरोग्य विभागाने रचला आहे. या कार्यक्रमाची कोणतीही घोषणा न करण्याचेही आरोग्य विभागाने ठरविले आहे. उद्घाटन झाल्यानंतर कोनशीला नंतर लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कार्यक्रमास आरोग्य विभागातील मोजकेच अधिकारी व कर्मचारी बोलावण्यात आले आहेत. राजशिष्टाचारानुसार शहरातील लोकप्रतिनिधींनाही बोलावण्यात आलेले नाही.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद्घाटनाची तयारी केली जात आहे; पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. वरिष्ठांकडून माहिती मिळल्यानंतर कळविण्यात येईल.- स्वप्नील लाळे, उपसंचालक, आरोग्यसेवा, औरंगाबादजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रधान सचिवांनी मंगळवारी पाहणी केली. रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याबाबत अधिकृत माहिती अद्याप आपल्याकडे आलेली नाही.- अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद
मिनी घाटीचे आज गुपचूप उद्घाटन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:44 AM