औरंगाबाद : मिनी घाटी म्हणजे चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती सेवा सुरू झाली असून ८ डिसेंबर रुग्णालयात पहिली प्रसुती झाली आणि आता एकामागोमाग एक प्रसूती होत आहेत. त्याचबरोबर आता सिझेरियन शस्त्रक्रियाही होणार आहे. शल्यचिकित्सागृहाच्या निर्जंतुकीकरणाचा अपेक्षित अहवाल प्राप्त झाल्याने आता सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत.
२०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक-एक विभाग कार्यान्वित होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभाग (आयपीडी) सुरू झाला. 'ओपीडी'मध्ये आतापर्यंत ४२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर, तर सुमारे २०० रुग्णांवर 'आयपीडी'मध्ये उपचार झाले. सध्या दोन्ही वेळच्या 'ओपीडी'मध्ये दररोज सुमारे ६०० रुग्णांवर उपचार होत आहे. आयुर्वेद ओपीडी, किमोथेरपी सेंटर रुग्णालयात सुरू झाले असतानाच लसीकरण विभागही रुग्णालयात कार्यान्वित झाला आहे.
सिटी स्कॅन मशीनसाठीचे कामही सुरू असून, लवकरच सिटी स्कॅनची सुविधा रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. रुग्णालयातील शल्यचिकित्सागृहाच्या (ओटी) निर्जंतुकीकरणाच्या अपेक्षित अहवाल मिळाल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्जंतुकीकरणाचा अहवाल उपलब्ध झाला आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू होतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक एस.व्ही. कुलकर्णी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर गर्भपविशवी काढणे, संतती नियमन आदी स्त्रीरोगासंबंधीच्या शस्त्रक्रियाही सुरू होतील. त्यापुढच्या टप्प्यात अपघात विभाग व त्यानंतर हळूहळू सर्व २१ विभागही सुरू होतील.