औरंगाबाद : कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना म्युकर मायकोसिस या काळ्या बुरशी आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारावरील उपचारासाठी खासगीत सहा लाखांपर्यंत खर्च येत असताना महात्मा जोतिबा फुले योजनेतून केवळ १५ हजार ते ६० हजारांच्या वेगवेगळ्या पॅकेजमध्ये उपचार कसे पूर्ण होणार, असा प्रश्न रुग्ण, नातेवाईकांसह डाॅक्टरांनाही सतावत आहे. त्यामुळे उर्वरित महागड्या औषधोपचारासाठीचे पैसे कोठून आणायचे, या प्रश्नाने रुग्णांचे कुटुंबीय धास्तावले आहेत.
आजपर्यंत ११६ रुग्णांची स्क्रिनिंग झाली. शुक्रवारी घाटी रुग्णालयात ५३ रुग्ण म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी भरती होते. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १८, नगर जिल्ह्यातील ८, बुलडाणा जिल्ह्यातील ६, बीड जिल्ह्यातील २, नांदेड २, नाशिक १, जालना जिल्ह्यातील ७, तर परभणी येथील २ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत नाकातून दुर्बिणीद्वारे म्युकरमायकोसिसच्या १६ शस्त्रक्रिया घाटीत करण्यात आल्या. त्यातील २ रुग्णांच्या टाळू तर दोघांचे डोळे काढावे लागले. यातील सर्व रुग्ण शस्त्रक्रियेनंतर बरे झाले. ८ रुग्णांना सुटी देण्यात आली असून, १० रुग्णांच्या डोळ्याच्या मागच्या बाजूस इंजेक्शन देण्यात आले. निदान झालेल्या १३ रुग्णांचा मृत्यू झाला. लवकर रुग्ण आल्यास त्याचे लवकर निदान होऊन शारीरिक वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्यास तत्काळ शस्त्रक्रिया करता येते. ३ तासांच्या मेजर अर्ली अग्रेसिव्ह सर्जरीने रुग्ण धोक्यातून बाहेर काढणे शक्य आहे, असे घाटीतील कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले. दररोज दोन ते तीन शस्त्रक्रिया कान, नाक व घसा, बधिरीकरण विभागासह नेत्ररुग्ण विभागाच्या मदतीने घाटीत होत आहे. मात्र, महागड्या औषधांचा जुन्या किंवा नव्या पॅकेजमध्ये समावेश नसल्याने या औषधांचा समावेश व्हावा, अशी मागणी तज्ज्ञांनी केली.
--
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण ११२
म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू २४
----
औषधी मोफत नावालाच
म्युकरमायकोसिसच्या उपचाराच्या पॅकेजमध्ये ज्या औषधांची किंमत अधिक आहेत त्याचा समावेश पॅकेजमध्ये नाही. ॲम्पोटेरेसीन बी इंजेक्शन दिवसातून गरजेनुसार सुमारे ३ द्यावे लागतात. सुमारे १४ दिवस द्यावे लागणाऱ्या इंजेक्शनवर ८० ते ९० हजारांपर्यंत खर्च होतो.
- या आजाराचे उपचार योजनेतून करण्याचा शासन आदेश निघाला असला तरी कोणती औषधी मोफत आणि कोणती विकत याबद्दल संभ्रमवस्था आहे. मात्र, उपचारासाठीच्या बहुतांश महागड्या औषधांचा खर्च रुग्णाच्या नातेवाईकांनाच पेलावा लागत आहे.
म्युकरमायकोसिस सर्जरीचे पॅकेज ६० हजारांचे आहे. पॅकेज कमी असल्याने त्याच्या इतर साहित्य व औषधी खरेदीही या योजनेतून शक्य होत नसल्याने त्याचा भुर्दंडही रुग्णाला सोसावा लागत आहे. तर या पॅकेजमधून सर्जरी करायलाही तज्ज्ञ नकार देत आहेत. आजारातून बरे होण्यासाठी लागणारा खर्च आणि योजनेतील पॅकेजमधील तरतूद यात मोठी तफावत असल्याचे डॉक्टर म्हणाले.
----
रुग्णाच्या नातेवाईकांना पैशांची चिंता
म्युकरमायकोसिसच्या आजारावरील तुटवडा असलेल्या औषधांच्या पुरवठ्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, रुग्णालयातून मागणी करूनही तसा पुरवठा न झाल्याने औषधांची इतरत्र शोधाशोध करावी लागत आहे. त्यात योजनेतून मोजक्याच औषधांची तरतूद आहे. इतर महाग औषधांसाठीचा खर्च परवडण्यासारखा नाही.
- सुकन्या सूर्यवंशी, नातेवाईक
कोरोना परवडाला पण म्युकरमायकोसिस नको अशी म्हणण्याची वेळ आहे. औषधांसाठी शोधाशोध करतोय. या औषधांचा समावेश पॅकेजमध्ये नाही. त्यापैकी एका औषधाचा खर्च लाखभरापेक्षा अधिक आहे. एका दिवसाचा बंदोबस्त झाला तरी उद्याच्या डोस कोठून देणार याची चिंता आहे. महागाईचे तर विचारायलाच नको.
-स्वप्निल बाविस्कर, नातेवाईक
---
पॅकेज नव्याने बनावायला हवे
म्युकरमायकोसिस मेडिकल पॅकेज ६० हजारांचे आहे. तर डोळ्यांसह नाकाद्वारे दुर्बिणीच्या शस्त्रक्रियांचे पॅकेज १५ हजार ते ४० हजार आहे. आयसीयू, इतर काॅम्पलिकेशन, बुरशीनाशक महागड्या औषधींचा समावेश पॅकेजमध्ये असायला हवा होता. जुनेच १०१२...................... च्या दराचे हे पॅकेज आहे. त्यातून पूर्ण मोफत उपचार अशक्य आहे. पॅकेज नव्याने आवश्यक औषधांसह असायला बनवायला पाहीजे.
-डॉ. सुचिता जोशी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, समन्वयक, घाटी रुग्णालय