छत्रपती संभाजीनगर: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम बुधवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, हा प्रकार पाहून संतापलेल्या मंत्री अब्दुल सत्तारांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यावेळी मंत्री सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आणि त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असे वादग्रस्त आदेश पोलिसांना दिले. यावरून आता मंत्री सत्तार यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम सुरू असताना समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय आल्याने मंत्री अब्दुल संतापले. माईक घेऊन थेट स्टेजवर पोहचत त्यांनी पोलिसांना हुल्लडबाजांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरुण काही ऐकायला तयार नव्हते. यामुळे संतापलेल्या मंत्री सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्जचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार एवढयावर थांबले नाही तर गोंधळ घालणाऱ्यांना कुत्र्यासारखं मारा. त्यांचे हाड मोडा. येथे एक हजार पोलीस आहेत, ५० हजार लोकांना मारायला काय लागते असे धक्कादायक वक्तव्य केले.
विरोधी पक्ष नेत्यांची टीकादरम्यान, यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजारोंच्या गर्दी समोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील "गुंड" समजतात का?...सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम? अशी टीका केली आहे. तसेच आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील, महायुती सरकारची हीच संस्कृती आहे. त्यांनी खरा चेहरा समोर आणला अशी टीका केली.